नवी दिल्ली : आयपीएलच्या सहाव्या पर्वातील भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी करीत असलेल्या न्यायमूर्ती मुदगल समितीने खेळाडूंच्या कृत्यांकडे श्रीनिवासन आणि बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी कानाडोळा केल्याचा ठपका ठेवला आहे. समितीने स्पष्ट केले की, ‘श्रीनिवासन व बीसीसीआयच्या चार अधिकाऱ्यांना चार खेळाडू नियमाचे उल्लंघन करीत असल्याची कल्पना होती; पण त्यांच्याविरुद्ध कुठल्याही अधिकाऱ्याने कुठलेच पाऊल उचलले नाही.’ १४ नोव्हेंबरला या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने सात नावांचा खुलासा केला होता. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने सेवानिवृत्त न्यायाधीश मुकुल मुद््गल यांच्या नेतृत्वाखालील समितीची विचारपूस केली. समितीच्या अहवालानुसार ‘श्रीनिवासन यांचे जावई हॉटेलच्या रूममध्ये सट्टेबाजांसोबत भेटले होते; पण त्यांचा सट्टेबाजीमध्ये समावेश असल्याचे पुरावे मिळालेले नाही. चौकशीनंतर गुरुनाथ मयप्पन चेन्नई सुपरकिंग्जचे अधिकारी असल्याची माहिती मिळाली; पण फिक्सिंगमध्ये त्यांचा समावेश असल्याचा पुरावा मिळालेला नाही.’ मयप्पनबाबत बोलताना चौकशी समितीने म्हटले आहे की, ‘चौकशीनंतर हे स्पष्ट झाले आहे की, मयप्पन हॉटेलच्या रूममध्ये वारंवार दोन व्यक्तींसोबत भेटत होता.’ समितीने १० फेब्रुवारी रोजी या प्रकरणाचा अंतरिम अहवाल सादर करताना याबाबत माहिती दिली होती. तज्ज्ञांनी मयप्पन यांच्या आवाजाच्या नमुन्याचे परीक्षण केले आणि हा आवाज मयप्पन यांचाच असल्याचे स्पष्ट झाले. मयप्पन व सट्टेबाजांसोबत मधस्थाची भूमिका बजाविणाऱ्या व्यक्तीसोबतचे मयप्पन यांचे संभाषण रेकॉर्ड करण्यात आले. त्यानंतर मयप्पन यांचा सट्टेबाजीमध्ये समावेश असल्याचे दिसून आले. दरम्यान, चौकशी अहवालामध्ये मयप्पनचा फिक्सिंगमध्ये समावेश असल्याचा कुठलाच पुरावा मिळाला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले; पण त्यांचा सट्टेबाजीच्या घटनेमध्ये समावेश होता, हे नमूद करण्यात आले.चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले राजस्थान रॉयल्सचे सहमालक राज कुंद्रा सट्टेबाजांच्या संपर्कात होते, असे समितीने म्हटले आहे. कुंद्रा यांनी बीसीसीआय आणि आयपीएलच्या भ्रष्टाचारविरोधी नियमांचे उल्लंघन केले. राज कुंद्रा सामन्यावर सट्टा लावत असल्याचे समितीने पुराव्याच्या आधारावर स्पष्ट केले. त्यांची ही कृती नियमांचे उल्लंघन करणारी आहे. आयपीएलचे मुख्य संचालन अधिकारी सुंदर रमणबाबत चौकशी समितीने स्पष्ट केले की, ‘सुंदर रमण सट्टेबाजांच्या संपर्कात होते. त्यांनी एका मोसमात त्यांच्यासोबत आठ वेळा संपर्क साधला. रमण यांनी सट्टेबाजांसोबत संपर्क साधल्याचे मान्य केले; पण सट्टेबाजीमध्ये समावेश नसल्याचे त्यांनी सांगितले.’समितीने पुढे सांगितले की, ‘गुरुनाथ मयप्पन व कुंद्रा यांचा सट्टेबाजीमध्ये समावेश असल्याची माहिती सुंदर रमण यांना मिळाली होती; पण आयसीसी भ्रष्टाचारविरोधी समितीच्या प्रमुखांनी त्यांना म्हटले की, केवळ या माहितीच्या आधारावर त्यांच्याविरुद्ध कारवाई करता येणार नाही. त्यानंतर त्यांनी ही माहिती दुसऱ्या कुणाला सांगितली नाही.’समितीने स्पष्ट केले की, चौकशी अहवाल पोलीस अधिकारी बी. बी. मिश्रा यांच्या चौकशीच्या आधारावर तयार करण्यात आलेला आहे. न्यायमूती टीएस ठाकूर आणि न्यायमूर्ती इब्राहिम कलिफुल्ला २४ नोव्हेंबरला या अहवालावर आपला निर्णय देतील. प्रकरणाची सुनावणी करीत असलेल्या दोन सदस्यांच्या खंडपीठाने सुरुवातीलाच चौकशीमध्ये समावेश असलेल्या ९ खेळाडूंची नावे राखून ठेवली आहेत. (वृत्तसंस्था)
खेळाडूंकडे कानाडोळा
By admin | Updated: November 18, 2014 01:09 IST