गुप्टिलचा आफ्रिकेला तडाखा
By Admin | Updated: March 2, 2017 00:26 IST2017-03-02T00:26:43+5:302017-03-02T00:26:43+5:30
गुप्टिलच्या धमाकेदार नाबाद शतकाच्या जोरावर न्यूझीलंडने चौथ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ७ विकेट्सने पराभव करून पाच सामन्यांच्या मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली

गुप्टिलचा आफ्रिकेला तडाखा
हॅमिल्टन : आक्रमक सलावीर मार्टिन गुप्टिलच्या धमाकेदार नाबाद शतकाच्या जोरावर न्यूझीलंडने चौथ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ७ विकेट्सने पराभव करून पाच सामन्यांच्या मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली. जबरदस्त पुनरागमन केलेल्या गुप्टिलच्या जोरावर किवी संघाने दक्षिण आफ्रिकेने दिलेले २८० धावांचे लक्ष्य ४५ षटकांतच ३ फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. विशेष म्हणजे १८० किंवा त्याहून अधिक धावांची खेळी सर्वाधिक तीन वेळा खेळणारा गुप्टिल क्रिकेटविश्वातील पहिला फलंदाज ठरला आहे. सेडन पार्क येथे झालेल्या या सामन्यात गुप्टिलचाच बोलबाला राहिला. धावांचा पाठलाग करताना त्याने सुरुवातीपासून राखलेला आक्रमक पवित्रा अखेरपर्यंत कायम राखून मालिकेत संघाचे आव्हान कायम ठेवण्यात निर्णायक भूमिका बजावली. गुप्टिलच्या धडाक्यापुढे आफ्रिकेचा एकही गोलंदाज चमक दाखवू शकला नाही. गुप्टिलने रॉस टेलरसह (६६) तिसऱ्या विकेटसाठी १८० धावांची विक्रमी भागीदारी करुन आफ्रिकेच्या आव्हानातली हवा काढली.
सलामीवीर डीन ब्राउनली (४) आणि कर्णधार केन विलियम्सन (२१) झटपट परतल्यानंतर गुप्टिलने आक्रमणाची सर्व सूत्रे आपल्याकडे घेताना टेलरसह आफ्रिकेची गोलंदाजी फोडून काढली. टेलर ९७ चेंडूत ७ चौकार व एका षटकारासह ६६ धावा काढून परतला. दुसरीकडे, गुप्टिलने १३८ चेंडूत १५ चौकार आणि तब्बल ११ षटकारांचा पाऊस पाडताना नाबाद १८० धावांचा झंझावात सादर केला. याआधी गुप्टिलने एकदिवसीय सामन्यात नाबाद २३९ आणि नाबाद १८९ धावांची खेळी केली आहे. तत्पूर्वी, कर्णधार एबी डिव्हिलियर्स (नाबाद ७२), फाफ डू प्लेसिस (६७) यांच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ८ बाद २७९ धावांची मजल मारली. अडखळत्या सुरुवातीनंतर ठराविक अंतराने बळी जात राहिल्याने दक्षिण आफ्रिकेच्या डावाला ब्रेक लागला होता. परंतु, डिव्हिलियर्सने मोक्याच्यावेळी आक्रमक फटके खेळताना संघाला समाधानकारक मजल मारुन दिली. (वृत्तसंस्था)
>संक्षिप्त धावफलक
दक्षिण आफ्रिका : ५० षटकात ८ बाद २७९ धावा (एबी डिव्हिलियर्स नाबाद ७२, फाफ डू प्लेसिस ६७; जीतन पटेल २/५७) पराभूत वि. न्यूझीलंड : ४५ षटकात ३ बाद २८० धावा. (मार्टिन गुप्टिल नाबाद १८०, रॉस टेलर ६६; इम्रान ताहिर २/५६)