गुजरातचा दुसरा विजय

By Admin | Updated: April 15, 2016 04:25 IST2016-04-15T04:25:59+5:302016-04-15T04:25:59+5:30

गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीनंतर अ‍ॅरोन फिंच व ब्रेंडन मॅक्युलम यांनी केलेली आक्रमक सुरुवात, या जोरावर गुजरात लायन्सने आयपीएलच्या नवव्या सत्रात सलग दुसरा विजय

Gujarat's second win | गुजरातचा दुसरा विजय

गुजरातचा दुसरा विजय

राजकोट : गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीनंतर अ‍ॅरोन फिंच व ब्रेंडन मॅक्युलम यांनी केलेली आक्रमक सुरुवात, या जोरावर गुजरात लायन्सने आयपीएलच्या नवव्या सत्रात सलग दुसरा विजय नोंदवत रायझिंग पुणे सुपरजायंट्सला ७ विकेट्सने नमवले. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पुणेकरांना मर्यादित धावसंख्येत रोखल्यानंतर सलामीवीरांनी गुजरातला वेगवान सुरुवात करून दिली.
सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पुण्याने दिलेल्या १६४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातने १८ षटकातंच ३ फलंदाज गमावत १६४ धावा फटकावल्या. फिंच - मॅक्युलम यांनी ८५ धावांची आक्रमक भागीदारी करून पुणेकरांना दबावाखाली ठेवले. फिंच ३६ चेंडंूत ५० धावा काढून बाद झाला. त्याने ७ चौकार व २ षटकारांनी आपली खेळी सजवली. तर केवळ एका धावेने अर्धशतक हुकलेल्या मॅक्युलमने ३१ चेंडंूत ३ चौकार व ३ षटकारांसह ४९ धावा फटकावल्या. या वेळी पुणेकर पुनरागमन करणार असे दिसत होते. मात्र कर्णधार सुरेश रैना (२४) आणि स्टार अष्टपैलू ड्वेन ब्राव्हो (नाबाद २२) यांनी संघाच्या विजयावर शिक्का मारला. पुण्याकडून मुरगन आश्विनने २ बळी घेतले.
तत्पूर्वी, आक्रमक फलंदाज फाफ डू प्लेसिसचे शानदार अर्धशतक व अखेरच्या क्षणी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने केलेला तुफानी हल्ला या जोरावर रायझिंग पुणे सुपरजायंट्सने गुजरात लायन्ससमोर २० षटकांत ५ बाद १६३ धावांची मजल मारली. पुण्याने एक वेळ २०० धावांकडे कूच केली होती. मात्र अखेरच्या काही षटकांत गुजरातने अचूक मारा करत पुणेकरांना रोखले.
अजिंक्य रहाणे-प्लेसिस यांनी संयमी फलंदाजी करताना हिरव्यागार खेळपट्टीचा अंदाज घेतला. अनुभवी लेगस्पिनर प्रवीण तांबेला फटकावण्याच्या प्रयत्नात तो पायचीत बाद झाला. रहाणेने १७ चेंडूंत ४ चौकारांसह २१ धावा काढल्या. यानंतर केविन पीटरसन व प्लेसिस यांनी दुसऱ्या विकेटसाठी नाबाद ८६ धावांची भागीदारी करून यजमानांना दमवले. पीटरसन ३१ चेंडंूत ३७ धावा काढून परतल्यानंतर प्लेसिसही अर्धशतक झळकावून ६९ धावांवर परतला. त्याने ४३ चेंडंूत ५ चौकार व ४ षटकार खेचले. स्टिव्ह स्मिथ व मिशेल मार्शही झटपट परतल्याने पुण्याचा डाव घसरला. मात्र धोनीने केवळ १० चेंडूंत २ चौकार व १ एका षटकारासह नाबाद २२ धावांचा तडाखा देत संघाला समाधानकारक मजल मारून दिली. (वृत्तसंस्था)

संक्षिप्त धावफलक :
रायझिंंग पुणे सुपरजायंट्स : २० षटकांत ५ बाद १६३ धावा (फाफ डू प्लेसिस ६९, केविन पीटरसन ३७, महेंद्रसिंह धोनी नाबाद २२; रवींद्र जडेजा २/१८, प्रवीण तांबे २/३३) पराभूत वि. गुजरात लायन्स : १८ षटकांत ३ बाद १६४ धावा (अ‍ॅरोन फिंच ५०, ब्रेंडन मॅक्युलम ४९, सुरेश रैना २४; मुरुगन आश्विन २/३१)

Web Title: Gujarat's second win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.