प्रार्थनाच्या यशाने बार्शीत आनंदोत्सव !
By Admin | Updated: September 29, 2014 06:35 IST2014-09-29T06:35:44+5:302014-09-29T06:35:44+5:30
आंतरराष्ट्रीय ख्यातीची व बार्शी (सोलापूर)ची टेनिसपटू प्रार्थना ठोंबरे हिने दक्षिण कोरियातील इंचियोन येथे झालेल्या आशियाई टेनिस स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी

प्रार्थनाच्या यशाने बार्शीत आनंदोत्सव !
भ. के. गव्हाणे, बार्शी
आंतरराष्ट्रीय ख्यातीची व बार्शी (सोलापूर)ची टेनिसपटू प्रार्थना ठोंबरे हिने दक्षिण कोरियातील इंचियोन येथे झालेल्या आशियाई टेनिस स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करून सोलापूर जिल्ह्याचे नाव जगाच्या नकाशावर झळकावले़ प्रार्थनाने या आशियाई स्पर्धेतील दुहेरीच्या लढतीत कांस्यपदक पटकावले़ तिच्या या कामगिरीने
संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासह
बार्शीतील क्रीडाजगतात आनंदोत्सव पसरला आहे़
प्रार्थनाने आज, रविवारी आंतरराष्ट्रीय भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा हिच्यासोबत उपांत्यफेरीच्या लढतीत चिनी ताईपेच्या जोडीविरुद्ध एक तास ३५ मिनिटांपर्यंत संघर्ष केला़ मात्र, ती फायनलपर्यंत पोहोचू शकली नाही़ त्यामुळे त्यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले़
माझे स्वप्न सुवर्णपदकाचे होते : प्रार्थना
दक्षिण कोरियातील इंचियोन येथील आशियाई टेनिस स्पर्धेतील माझे पदक निश्चित होतेच; मात्र माझे स्वप्न सुवर्णपदक मिळविण्याचे होते, अशी महत्त्वाकांक्षी प्रतिक्रिया जिद्दी प्रार्थना ठोंबरेने दिली़
प्रार्थनाने आपली आई वर्षा ठोंबरे हिच्यासोबत ‘व्हॉट्स अॅप’वर संपर्क साधला असता तिने वरील प्रतिक्रिया दिली़ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी आपण संपूर्ण तयारी केली होती़
सानियासोबत खेळण्याचा अनुभव हा निराळाच होता़ तिच्याकडून खूप काही शिकता आले़ आम्ही दोघींनी विजयासाठी खूपच संघर्ष केला; मात्र नशिबाने चिनी ताईपेच्या बाजूने विजयाचा कौल दिला़