क्रीडाग्राममध्ये भारतीयांचे शानदार स्वागत
By Admin | Updated: August 4, 2016 03:52 IST2016-08-04T03:52:08+5:302016-08-04T03:52:08+5:30
आॅलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंसाठी बुधवारी क्रीडाग्राममध्ये शानदार स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

क्रीडाग्राममध्ये भारतीयांचे शानदार स्वागत
रिओ : आॅलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंसाठी बुधवारी क्रीडाग्राममध्ये शानदार स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या वेळी ब्राझीलच्या संस्कृतीची झलक सादर करण्यात आली. संगीत आणि नृत्याची मेजवानी खेळाडूंना सुखावून गेली.
४५ मिनिटे चाललेल्या या सोहळ्यात भारतीय पथकातील अर्ध्याहून अधिक सदस्यांचा समावेश होता. पांढऱ्या ट्रॅकसूटमध्ये असलेल्या खेळाडूंच्या चेहऱ्यांवरील उत्साह ओसंडून वाहत होता. भारतीय आॅलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष एन. रामचंद्रन आणि पथकप्रमुख राकेश गुप्ता यांनी शहराचे महापौर, माजी बास्केटबॉल खेळाडू आणि दोन वेळचे आॅलिम्पिक पदकविजेते जेनेथ अर्केन यांना दोन भेटवस्तू दिल्या. त्यात चांदीच्या हत्तींची जोडी आणि सोन्याचा मुलामा असलेला मोर होता. दोन्ही स्मृतिचिन्हांवर आयओएचा लोगो लागलेला होता.
संगीताच्या तालावर भारतासह बहमास, बुर्किना फासो, झाम्बिया आणि नॉर्वेच्या पथकाचे स्वागत झाले. स्वागत सोहळ्यात प्रत्येक देशाचा ध्वज फडकविण्यात आला. शिवाय राष्ट्रगीत वाद्यांद्वारे सादर करण्यात आले. स्वागत सोहळ्याची सुरुवात आदिवासी नृत्याद्वारे झाली. ब्राझीलचे महान संगीतकार दिवंगत राऊल सेइ क्वास आणि टीम मेइया यांची गीते वाजविण्यात आली. संगीत आणि नृत्यापाठोपाठ रिओच्या महापौरांनी सर्वांचे स्वागत केले.
समारंभात उपस्थित खेळडूंत नेमबाज जीतू राय, प्रकाश नांजप्पा, गुरुप्रितसिंग, चैनसिंग, धावपटू सुखबीर कौर, मनप्रीत कौर, महिला हॉकी संघ, जलतरणपटू साजन प्रकाश, शिवानी कटारिया, यांच्यासह प्रशिक्षक व अधिकाऱ्यांचा समावेश होता. भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांचीही हजेरी होती. भारताचे १२० सदस्यांचे पथक १५ क्रीडाप्रकारांत सहभागी होणार आहे.(वृत्तसंस्था)
>भारतीय खेळाडूंसाठी खुर्च्या, टीव्ही संच खरेदी करणार
आॅलिम्पिक आयोजन समितीने अतिरिक्त खुर्च्या आणि टीव्ही संच पुरविण्यास नकार दिल्यानंतर भारतीय आॅलिम्पिक पथकप्रमुख राकेश गुप्ता यांनी भारतीय दूतावासाच्या माध्यमातून हे सामान खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
गुप्ता म्हणाले, ‘‘हॉकी संघाने अतिरिक्त खुर्च्या तसेच टीव्ही संच पुरविण्याची विनंती केली होती. मी आयोजन समितीला यासंदर्भात विनंती केली. पण त्यांनी असमर्थता दाखविली. सर्व राष्ट्रीय क्रीडा महासंघांना एकसारखीच सुविधा देण्यात आली असल्याचे त्यांचे मत होते.’’
दरम्यान, गुप्ता यांनी स्वत:च्या कार्यालयातील खुर्च्या आणि टीव्ही संच भारतीय हॉकी संघासाठी उपलब्ध करून दिले. अॅथलेटिक्स पथकानेदेखील साहित्याची मागणी केली होती. अखेर गुप्ता यांनी भारतीय दूतावासाच्या माध्यमातून साहित्य खरेदी करण्याचा निर्णय घेतला. पुढील काही दिवसांत हे साहित्य अपार्टमेंटमध्ये आणले जाणार आहे.