'रन फॉर रिओ'ला पंतप्रधान मोदी दाखवणार हिरवा झेंडा
By Admin | Updated: July 23, 2016 17:57 IST2016-07-23T17:56:21+5:302016-07-23T17:57:43+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३१ जुलैला दिल्ली येथे इंडिया गेटवर ‘रन फॉर रिओ’ उपक्रमाला हिरवा झेंडा दाखवणार आहेत

'रन फॉर रिओ'ला पंतप्रधान मोदी दाखवणार हिरवा झेंडा
>ऑनलाइन लोकमत -
रन फॉर रिओ : ऑलिम्पिक खेळांबाबत उत्साह निर्माण करण्यासाठी उपक्रम
नवी दिल्ली, दि. 23 -आगामी ५ ऑगस्टपासून सुरु होणा-या ऑलिम्पिक स्पर्धेआधी देशामध्ये या खेळांविषयी उत्साह निर्माण होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ३१ जुलैला दिल्ली येथे इंडिया गेटवर ‘रन फॉर रिओ’ उपक्रमाला हिरवा झेंडा दाखवतील.
क्रीडामंत्री विजय गोयल यांनी शनिवारी येथे झालेल्या एका कार्यक्रमात याबद्दल माहिती देताना सांगितले, ‘‘आम्ही देशात ऑलिम्पिकबाबत उत्साह निर्माण करु इच्छितो. यामुळेच इंडिया गेट येथे ‘रन फॉर रिओ’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मी ज्यावेळी याबाबत मोदी यांना कल्पना दिली, तेव्हा त्यांनी स्वत:हून या कार्यक्रमाला हिरवा झेंडा दाखवण्याची इच्छा व्यक्त केली. यावेळी हजारो क्रीडाप्रेमी ऑलिम्पिक खेळाडूंना पाठिंबा दर्शवण्यासाठी धावतील.’’
विशेष म्हणजे एक ऑगस्टपासून सेंट्रल पार्क येथे भव्य स्क्रीन लावण्यात येणार आहे, ज्यावर ऑलिम्पिकचे थेट प्रसारण दाखवण्यात येईल. याविषयी गोयल म्हणाले, ‘‘सेंट्रल पार्क येथे तिरंग्याखाली मोठा स्क्रीन लावण्यात येणार असून याशिवाय येथे विजेंदरसिंगसह अन्य ओलिम्पियन खेळाडूंचे कटआऊटही लावण्यात येतील.’’
सानियाची आई भारतीय पथकाची फिजिओ -
ऑलिम्पिकमध्ये महिला मल्लांसह महिला फिजिओ म्हणून अव्वल टेनिसपटू सानिया मिर्झाची आई नसीमा मिर्झा जाणार आहे. याबाबत क्रीडा सचिव राजीव यादव म्हणाले, ‘‘सानिया मिर्झाची आई नसीमा अन्य अधिका-यांसह महिला फिजिओ म्हणून भारतीय संघासोबत रिओला जाणार आहे. सानिया जगातील अव्वल टेनिसपटू असून नसीमाला तीच्यासह पाठवण्याची विनंती मान्य करण्यात आली आहे. तसेच नसीमा या महिला संघाच्या व्यवस्थापिका देखील आहेत.’’