स्कॉटलंडचा शानदार विजय

By Admin | Updated: February 11, 2015 01:37 IST2015-02-11T01:37:02+5:302015-02-11T01:37:02+5:30

मॅट माचनच्या (१०३) शतकी खेळीनंतर अ‍ॅलेसडेयर इवांस व माजिद हक यांच्या अचूक माऱ्याच्या जोरावर स्कॉटलंडने विश्वकप स्पर्धेच्या सराव सामन्यात

Great Victory of Scotland | स्कॉटलंडचा शानदार विजय

स्कॉटलंडचा शानदार विजय

सिडनी : मॅट माचनच्या (१०३) शतकी खेळीनंतर अ‍ॅलेसडेयर इवांस व माजिद हक यांच्या अचूक माऱ्याच्या जोरावर स्कॉटलंडने विश्वकप स्पर्धेच्या सराव सामन्यात मंगळवारी आयर्लंडचा १७९ धावांनी पराभव केला. आयर्लंड संघ २०१९च्या विश्वकप स्पर्धेत अव्वल १० संघांमध्ये स्थान निश्चित करण्याची मागणी करीत आहे. पण, स्कॉटलंडने मोठ्या फरकाने विजय मिळविल्यामुळे आयर्लंडकडे अद्याप अव्वल १०मध्ये स्थान मिळविण्याची पात्रता नसल्याची प्रचिती आली. पुढील विश्वकप स्पर्धेत १० संघ सहभागी होणार असून, त्यात जगातील अव्वल ८ वन-डे संघाचा समावेश राहणार असून, उर्वरित दोन संघ पात्रता फेरीनंतर निश्चित होतील.
स्कॉटलंडने निर्धारित ५० षटकांत ६ बाद २९६ धावांची मजल मारली आणि प्रतिस्पर्धी आयर्लंडचा डाव २७ षटकांत ११७ धावांत गुंडाळला. मॅट माचनने १०८ चेंडूंना सामोरे जाताना १०३ धावांची खेळी केली. त्यात ६ चौकार व ४ षटकारांचा समावेश आहे. कर्णधार प्रेस्टन मोंमसेनने ७० चेंडूंमध्ये पाच चौकार व १ षटकारासह ५६ धावा फटकाविल्या. रिची बॅरिंगटनने (५२ धावा, ४० चेंडू, २ चौकार, २ षटकार) अर्धशतकी खेळी केली. आयर्लंडतर्फे सलामीवीर पॉल स्टर्लिंगने ३७ व कर्णधार विलियम पोटरफिल्डने २३ धावा फटकाविल्या. सलामीला ५७ धावांची भागीदारी झाल्यानंतर आयर्लंड संघाने
६० धावांत १० विकेट गमाविल्या. इवांसने ५ षटकांत १७ धावांच्या मोबदल्यात ५ बळी घेतले, तर
हकने ४ षटकांत ९ धावांच्या मोबदल्यात ३ फलंदाजांना माघारी परतवले.
विश्वकप स्पर्धेत आयर्लंडचा ‘ब’ गटात समावेश आहे. या गटात दक्षिण आफ्रिका, भारत आणि पाकिस्तान यांच्यासारख्या संघांचा समावेश आहे. स्कॉटलंड संघ ‘अ’ गटात असून, यात सहयजमान आॅस्ट्रेलिया व न्यूझीलंड यांच्या व्यतिरिक्त इंग्लंड व श्रीलंका हे संघ आहेत. (वृत्तसंस्था)

Web Title: Great Victory of Scotland

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.