रिओ ऑलिम्पिकची शानदार सुरुवात

By Admin | Updated: August 6, 2016 12:19 IST2016-08-06T08:55:12+5:302016-08-06T12:19:04+5:30

ब्राझीलच्या रिओ दी जानिरो येथे ३१व्या ऑलिम्पिक स्पर्धेची दिमाखात सुरुवात झाली आहे, उदघाटन सोहळ्यात अभिनव बिंद्रानं ध्वजवाहक म्हणून भारतीय पथकाचं नेतृत्त्व केलं

A great start of the Rio Olympics | रिओ ऑलिम्पिकची शानदार सुरुवात

रिओ ऑलिम्पिकची शानदार सुरुवात

ऑनलाइन लोकमत - 
रिओ (ब्राझिल), दि. 6 - ब्राझीलच्या रिओ दी जानिरो येथे ३१व्या ऑलिम्पिक स्पर्धेची दिमाखात सुरुवात झाली आहे. भव्यदिव्य उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर अधिकृतपणे स्पर्धेला सुरुवात झाली आहे. रिओच्या ऐतिहासिक माराकाना स्टेडियमवर तब्बल 78 हजारांहून अधिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी ब्राझिलच्या संस्कृतीची ओळख करुन देणारं, तसेच पर्यावरण संरक्षणाच्या जनजागृतीचं सादरीकरण करण्यात आलं. ऑलिम्पिकच्या उदघाटन सोहळ्यात अभिनव बिंद्रानं ध्वजवाहक म्हणून भारतीय पथकाचं नेतृत्त्व केलं. 
 
डोपिंग स्कँडलमुळे भारतीयांच्या उत्साहावर काहीसे विरजण पडले, तरीही ऑॅलिम्पिक क्रीडा महाकुंभात सर्वांत मोठ्या भारतीय पथकाकडून सर्वोत्कृष्ट कामगिरीसह अधिकाधिक पदकांच्या अपेक्षा सव्वाशे कोटी भारतीय बाळगून आहेत. लंडनच्या सहा पदकांच्या तुलनेत यंदा दुप्पट पदके भारताला मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
भारतीय पथकातील ११८ खेळाडू पदकांची संख्या दुप्पट करण्याच्या प्रयत्नात निश्चितच असतील. धावपटू धरमवीर आणि गोळाफेकपटू इंदरजितसिंग हे डोपिंगमध्ये अपयशी ठरल्याने त्यांना भारतातच थांबण्यास सांगण्यात आले आहे. याआधी नरसिंगदेखील डोपिंगमध्ये अपयशी ठरला होता; पण नाडाच्या सुनावणीत तो सहीसलामत बाहेर पडल्यामुळे आणि विश्व कुस्ती महासंघाने परवानगी बहाल केल्याने नरसिंग येथे पोहोचण्याची शक्यता आहे.
 
 
शनिवारी स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी जबर फॉर्ममध्ये असलेला नेमबाज जीतू राय याच्या ५० मीटर पिस्तुल तसेच १० मीटर एअर पिस्तुल प्रकारावर नजर असेल. तो रँकिंगमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे; शिवाय विश्वचषकात दोन सुवर्ण, दोन रौप्य तसेच एका कांस्य पदकाचा मानकरी आहे. एशियाड आणि राष्ट्रकुलचा सुवर्णविजेतादेखील आहे. जीतूकडून दोन्ही प्रकारांत पदकाची आशा आहे.
कुस्तीत नरसिंग सर्व वाद मागे सारून ७४ किलो फ्रीस्टाईलमध्ये कशी कामगिरी करतो, याकडे लक्ष असेल. लंडन आॅलिम्पिकचा कांस्यविजेता योगेश्वर दत्त ६५ किलो फ्रीस्टाईलमध्ये लढणार आहे. कुस्तीत ८ मल्ल फ्रीस्टाईल, ग्रीकोरोमन आणि महिला गटात खेळणार आहेत. लंडनमध्ये गीता फोगाट आॅलिम्पिक खेळणारी पहिली भारतीय महिला होती. यंदा विनेश फोगाट ४८ किलो, बबिताकुमारी ५३ किलो, साक्षी मलिक ५८ किलो या तीन महिला रिंगणात आहेत. विनेशने पात्रता स्पर्धेत विश्व चॅम्पियनशिपची रौप्यविजेती इवोना मॅल्कोव्हस्का हिला नमविले होते.
बॉक्सिंगमध्ये लंडनमध्ये ८ बॉक्सर होते, तर येथे केवळ ३ बॉक्सर असतील. शिवा थापा ५६, विकास कृष्णन ७५ तसेच मनोजकुमार ६४ यांच्यावर भिस्त आहे. लंडनमध्ये अपेक्षेनुरूप कामगिरी करण्यात अपयशी ठरलेले तिरंदाज १५ दिवसांआधीच येथे दाखल झाले आहेत. तिसऱ्यांदा आॅलिम्पिक खेळणारी बोंबाल्यादेवी, माजी विश्व नंबर वन दीपिकाकुमारी आणि लक्ष्मीराणी मांझी यांच्या संघाकडून पदकाची आशा राहील.
 
बॅडमिंटनमध्ये भारताची सर्वांत मोठी आशा सायना नेहवाल असेल. लंडन आॅलिम्पिकमध्ये कांस्य जिंकणाऱ्या सायनाला यंदा रौप्य किंवा सुवर्ण जिंकण्याची संधी राहील. जिम्नॅस्टिकमध्ये २२ वर्षांची दीपा करमाकर आॅलिम्पिकसाठी पात्र ठरलेली पहिली भारतीय ठरली. तिच्याकडूनही अपेक्षा असतील.
भारतीय महिला हॉकी संघ ३६ वर्षांनंतर पात्र ठरला. पी. आर. ब्रिजेशच्या नेतृत्वाखालील पुरुष हॉकी संघाकडूनही पहिल्या टप्प्यात उपांत्यपूर्व फेरी गाठण्याची अपेक्षा आहे. भारताला अर्जेंटिना, कॅनडा, जर्मनी, आयर्लंड आणि नेदरलँड्स या संघांच्या गटात स्थान देण्यात आले.
 
यांच्याकडून अपेक्षा...
अभिनव बिंद्रा, गगन नारंग, जीतू राय, सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू, नरसिंग यादव, सानिया मिर्झा, लिएंडर पेस, रोहन बोपन्ना, शिवा थापा, विकास कृष्णन, दीपिकाकुमारी, दीपा करमाकर, विकास गौडा तसेच पुरुष हॉकी संघ.
 
भारताचे आव्हान...
तिरंदाजी ४, अ‍ॅथलेटिक्स ३३, बॅडमिंटन ७, बॉक्सिंग ३, हॉकी (पुरुष व महिला) ३६, गोल्फ ३, जिम्नॅस्टिक १, ज्यूदो १, नौकानयन १, नेमबाजी १२, जलतरण २, टेबल टेनिस ४, टेनिस ४, वेटलिफ्टिंग २, कुस्ती ८.

Web Title: A great start of the Rio Olympics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.