नारायणन बनला ग्रॅण्डमास्टर!
By Admin | Updated: October 16, 2014 01:36 IST2014-10-16T01:36:00+5:302014-10-16T01:36:00+5:30
जागतिक ज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धा अंतिम टप्प्याकडे वाटचाल करीत असताना आज दोन भारतीय खेळाडूंनी दिवस गाजवला.

नारायणन बनला ग्रॅण्डमास्टर!
अमोल मचाले, पुणे
जागतिक ज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धा अंतिम टप्प्याकडे वाटचाल करीत असताना आज दोन भारतीय खेळाडूंनी दिवस गाजवला. स्पर्धेच्या प्रारंभापासून आश्वासक कामगिरी करणारा इंटरनॅशनल मास्टर सुनीलधूत नारायणन याने नवव्या फेरीत भारतीय ग्रॅण्डमास्टर विदित गुजराथीला बरोबरीत रोखून ग्रॅण्डमास्टर पदासाठी आवश्यक नॉर्म पूर्ण केला. मुलींमध्ये पी. व्ही. नंदिताने भारताच्याच प्रत्युषा बोडा हिच्यावर सरशी साधत ‘वूमन इंटरनॅशनल मास्टर’चा दर्जा मिळवला. प्रत्युषाचा हा नॉर्म कालच पूर्ण झाला.
नारायणनच्या बाबतीत सांगायचे झाल्यास प्रारंभीच्या काही फेरी वगळता या इंटरनॅशनल मास्टरने ग्रॅण्डमास्टर दर्जाला साजेसाच खेळ केला होता. त्याची गुणवत्ता पाहता ग्रॅण्डमास्टर नॉर्म ही त्याच्यासाठी केवळ औपचारिकता होती, असेच म्हणावे लागेल. पुण्यात सुरू असलेल्या या स्पर्धेतील तिसऱ्या आणि चौथ्या फेरीत ‘नारायणा’स्त्रासमोर ग्रॅण्डमास्टर दर्जाच्या खेळाडूंनी गुडघे टेकले होते. त्याच वेळी या खेळाडूवर खास लक्ष ठेवायला हवे, हे एव्हाना प्रतिस्पर्ध्यांच्या लक्षात आले होते. सातव्या फेरीनंतर ग्रॅण्डमास्टर होण्यासाठी त्याला किमान ‘ड्रॉ’ची गरज होती. मात्र, आठव्या फेरीत चीनच्या वेई यी याच्याकडून पराभूत झाल्याने त्याची प्रतीक्षा लांबली. आज अखेर विदितला बरोबरीत रोखून केरळच्या १६ वर्षीय नारायणन याने कारकिर्दीतील हा मोलाचा टप्पा गाठला. मुलींमध्ये तमिळनाडूच्या १८ वर्षीय नंदिताने आज पूर्ण गुण मिळवत वूमन इंटरनॅशनल मास्टर बनण्याचा मान मिळवला. नवव्या फेरीअखेर ७ गुणांची कमाई करीत ती संयुक्तपणे दुसऱ्या स्थानी आहे. इराणची सारादत खादेमलाशरेह हिने ७.५ गुण मिळवत आघाडी घेतली आहे. खुल्या गटात वेई यी व लू शांगलूई हे चीनचे खेळाडू संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहेत. आज या खेळाडूंतील लढत बरोबरीत सुटली.