आवडते काम मिळाले : द्रविड
By Admin | Updated: June 8, 2015 00:52 IST2015-06-08T00:52:04+5:302015-06-08T00:52:04+5:30
भविष्यातील पिढीच्या क्रिकेटपटूंना तयार करण्याची जबाबदारी स्वीकारण्यास नेहमीच सज्ज होतो आणि आता जबाबदारी मिळाल्यानंतर सर्वोत्तम देण्याची तयारी आहे अशी प्रतिक्रिया राहुल द्रविडने व्यक्त केली.

आवडते काम मिळाले : द्रविड
नवी दिल्ली : भविष्यातील पिढीच्या क्रिकेटपटूंना तयार करण्याची जबाबदारी स्वीकारण्यास नेहमीच सज्ज होतो आणि आता जबाबदारी मिळाल्यानंतर सर्वोत्तम देण्याची तयारी आहे, अशी प्रतिक्रिया भारत ‘अ’ व अंडर-१९ संघाचा नवनियुक्त प्रशिक्षक राहुल द्रविडने व्यक्त केली.
द्रविड म्हणाला, ‘माझ्या आवडीचे हे क्षेत्र आहे. अनेक क्रिकेटपटूंसाठी हा महत्त्वाचा काळ असतो. मला त्यांच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावण्याची संधी मिळाली आहे. युवा खेळाडूंना माझ्या अनुभवाचा लाभ मिळेल.’
वरिष्ठ संघाच्या प्रशिक्षकपदाचा दावा मजबूत करण्याची संधी म्हणून या जबाबदारीचा विचार करीत नसल्याचे द्रविडने सांगितले. सीनिअर संघाचे प्रशिक्षकपद माझे लक्ष्य नसल्याचे द्रविड म्हणाला. त्याने सांगितले की, ‘युवा खेळाडूंसोबत काम करण्याची आवड आहे. राष्ट्रीय संघाच्या प्रशिक्षकाच्या तुलनेत याची व्याप्ती कमी आहे. ही भूमिका बजावण्यासाठी मी सज्ज आहे.’
नवनियुक्त सल्लागार समितीकडून मदतीची अपेक्षा आहे. या समितीमध्ये माझे सहकारी खेळाडू सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली व व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा समावेश आहे. युवा खेळाडूंसाठी उपयुक्त ठरणारी रणनीती तयार करण्यावर भर राहील. नव्या दमाचे क्रिकेटपटू पुढे येण्याासठी अनुकूल वातावरण तयार करणार असून त्यांना संधी मिळावी यासाठी प्रयत्न राहील, असेही द्रविड म्हणाला. युवा खेळाडूंच्या मदतीसाठी सचिन, सौरव व लक्ष्मण यांचे सहकार्य अपेक्षित असून गरज भासल्यास भारतीय संघाचे संचालक रवी शास्त्री यांच्यासोबत संपर्क साधण्यासाठी संकोच बाळगणार नसल्याचे द्रविडने यावेळी स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)
पीटरसन म्हणतो चांगला निर्णय
1 राहुल द्रविडकडे भारत ‘अ’ आणि अंडर-१९ संघंच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपविण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयाची भारतासह जगात प्रशंसा होत आहे. इंग्लंडचा माजी फलंदाज केव्हिन पीटरसनने हे चांगले पाऊल असल्याचे म्हटले आहे.
2 पीटरसनने टिष्ट्वट केले की, ‘बीसीसीआयने राहुल द्रविडला अंडर-१९ आणि ‘अ’ संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवली आहे. हे चांगले पाऊल आहे. युवा खेळाडूंना द्रविडच्या मार्गदर्शनाखाली सराव करताना किती आनंद मिळले, हे सांगता येणे कठीण आहे. राहुलचा स्वभाव प्रशंसेस पात्र आहे. त्याला आधुनिक क्रिकेटची चांगली जाण असून जगभरातील खेळपट्ट्यांवर त्याने धावा वसूल केल्या आहेत. तो खडतर प्रतिस्पर्धी आहे. वेल डन बीसीसीआय.’
3 १६४ कसोटी सामन्यांत १३२८८ व ३४४ वन-डे सामन्यांत १०८८९ धावा फटकावणाऱ्या द्रविडला राष्ट्रीय संघाच्या प्रशिक्षकपदाचा प्रस्ताव देण्यात आला होता, पण त्याने कौटुंबिक कारणामुळे हा प्रस्ताव नाकारला.’