चांगल्या गोलंदाजीची व फलंदाजीची आवश्यकता - जेम्स अँडरसन
By Admin | Updated: November 18, 2016 00:22 IST2016-11-18T00:22:03+5:302016-11-18T00:22:03+5:30
इंग्लंडला या सामन्यात पुनरागमन करण्यासाठी चांगली गोलंदाजी आणि फलंदाजी करावी लागेल.

चांगल्या गोलंदाजीची व फलंदाजीची आवश्यकता - जेम्स अँडरसन
विशाखापट्टणम : भारताविरुद्ध दुसऱ्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी दबावाखाली आलेला इंग्लंड संघ पुनरागमनासाठी जोरदार प्रयत्न करीत असून, त्यांचा प्रमुख वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याने म्हटले की, ‘इंग्लंडला या सामन्यात पुनरागमन करण्यासाठी चांगली गोलंदाजी आणि फलंदाजी करावी लागेल.’
यजमानांना सुरुवातीला झटके देऊन दडपणाखाली आणलेल्या इंग्लंडला यानंतर पुजारा - कोहली यांनी चांगलेच दमवले. पहिल्या दिवसाचा खेळ थांबल्यानंतर अँडरसनने सांगितले की, ‘या सामन्यातील खेळपट्टी अशीच राहील किंवा राजकोट सारखी होईल याबाबत मी नक्की काहीच सांगू शकत नाही. माझ्यामते ही खेळपट्टी गोलंदाजीसाठी खूप कठीण होती. कोहली आणि पुजारा दोघांनीही शानदार फलंदाजी केली. यासह त्यांनी स्वत:ला शानदार खेळाडू असल्याचे सिध्द केले. त्यांनी गोलंदाजी करणे आणखी कठीण केले.’
दरम्यान, दिवसभरात भारताच्या गेलेल्या ४ बळींपैकी ३ बळी अँडरसनने घेतले. त्याने पुजाराच्या रुपाने इंग्लंडला महत्त्वपूर्ण बळी मिळवून दिला. यानंतर नव्या चेंडूवर त्याने अजिंक्य रहाणेला बाद केले. तत्पूर्वी पहिल्या सत्रात अँडरसनने धोकादायक मुरली विजयलाही तंबूचा रस्ता दाखवला होता. त्याचवेळी, दुसऱ्या दिवशी सकाळच्या वातावरणाचा फायदा घेत भारताचा डाव लवकर संपुष्टात आणू, असा विश्वासही अँडरसनने व्यक्त केला. (वृत्तसंस्था)