सुवर्णकन्येने गावाला झळकाविले विजेने
By Admin | Updated: September 1, 2016 06:10 IST2016-09-01T06:10:09+5:302016-09-01T06:10:09+5:30
आॅलिम्पिकमध्ये देशासाठी पदक जिंकल्यानंतर त्या खेळाडूवर विविध स्तरांतून बक्षिसांचा वर्षाव होत असतो. भारतातही रिओ आॅलिम्पिकमध्ये रौप्य व कांस्यपदक विजेत्या

सुवर्णकन्येने गावाला झळकाविले विजेने
नैरोबी : आॅलिम्पिकमध्ये देशासाठी पदक जिंकल्यानंतर त्या खेळाडूवर विविध स्तरांतून बक्षिसांचा वर्षाव होत असतो. भारतातही रिओ आॅलिम्पिकमध्ये रौप्य व कांस्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधू आणि साक्षी मलिक यांच्यावर भरघोस बक्षिसांचा वर्षाव झाला. अगदी बीएमडब्ल्यूसारखी महागडी गाडीदेखील खेळाडूंना बक्षीस म्हणून मिळाली. मात्र, आफ्रिका खंडातील केनिया देशाच्या फेथ किपीएगन हिने अॅथलेटिक्समध्ये मिळवलेल्या सुवर्णपदकाचे बक्षीस म्हणून संपूर्ण गावाला ‘वीज’ मिळाली आहे.
फेथ केनियाच्या नदाबिबित या खेडेगावाची रहिवासी असून, तिच्या गावात तब्बल १९८० सालापासून वीज नाही. दखल घेण्याची बाब म्हणजे, या कारणामुळे फेथच्या कुटुंबीयांना आपल्या मुलीने केलेला पराक्रम पाहता आला नाही. फेथने रिओ आॅलिम्पिकमध्ये १५०० मीटर शर्यतीत सुवर्ण पटकावताना यंदाच्या वर्षातील सर्वांत वेगवान वेळ नोंदवण्याचा पराक्रम केला. मात्र, वीज नसल्याने आपल्या मुलीची ही विक्रमी कामगिरी पाहण्याची संधी मुकल्याने तिचे वडील कोएच यांनी थेट राष्ट्राध्यक्ष उहुरू केन्याट्टा यांच्याकडे विनंती केली की, ‘कृपया आमच्या गावामध्ये वीज आणावी. यामुळे मी माझ्या मुलीला केनियासाठी अधिक पदक जिंकताना पाहू शकेल.’’
विशेष म्हणजे, फेथच्या वडिलांनी केलेल्या विनंतीला केनियन सरकारनेही तत्काळ प्रतिसाद देताना फेथच्या गावामध्ये वीजपुरवठा केला. त्याचबरोबर, एका जगप्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक्स कंपनीनेदेखील फेथच्या घरी अत्याधुनिक फ्लॅट स्क्रीन टीव्हीची भेट दिली. फेथने रिओ आॅलिम्पिकमध्ये केलेल्या विक्रमी कामगिरीमुळे आज तिचे संपूर्ण गाव उजळले आहे. विशेष म्हणजे गेल्या ३० वर्षांत पहिल्यांदाच फेथच्या गावकऱ्यांनी वीज पाहिली. त्याच वेळी वडील कोएच यांनी मात्र या यशाचे सर्व श्रेय आपल्या मुलीला देताना सांगितले की, ‘‘फेथने घेतलेल्या मेहनतीमुळे आणि तिने केलेल्या पराक्रमामुळेच आज गावामध्ये वीज पाहायला मिळत आहे.’’
थोडक्यात, शंभर करोडहून अधिक लोकसंख्येचा भारत देश आॅलिम्पिकमध्ये पदकासाठी झगडत असताना, कोणतीही मूलभूत सोयीसुविधा नसलेल्या केनियाच्या एका खेडेगावातील मुलगी थेट आॅलिम्पिक सुवर्णपदकाला गवसणी घालते, ही बाब निश्चित विचार करण्यास लावते. सुमारे ३ दशके अंधारात घालवलेल्या गावाला आपल्या मुलीने मिळवलेल्या आॅलिम्पिक सुवर्णपदकामुळे वीज मिळाली. (वृत्तसंस्था)