भारतीय हॉकीचा सुवर्णकाळ
By Admin | Updated: July 18, 2016 06:22 IST2016-07-18T06:22:48+5:302016-07-18T06:22:48+5:30
आपल्या देशाचा राष्ट्रीय खेळ तसा हॉकी; पण त्या खेळाचा विसर सध्या भारतीय क्रीडाप्रेमींना पडला आहे.

भारतीय हॉकीचा सुवर्णकाळ
आपल्या देशाचा राष्ट्रीय खेळ तसा हॉकी; पण त्या खेळाचा विसर सध्या भारतीय क्रीडाप्रेमींना पडला आहे. क्रिकेटने सर्वांवर जादू केली आहे. पण क्रिकेट हा खेळ आॅलिम्पिकमध्ये नाही, याचीसुद्धा सर्वांना कल्पना आहे. आॅलिम्पिक म्हटले, की जगातील क्रीडापटूंना एक कुंभमेळा वाटतो. प्रत्येक देशातील विविध खेळांचे खेळाडू पदक जिंकून आपल्या देशाचा ध्वज तेथे फडकाविण्यासाठी जिवाची बाजी लावतात. प्रत्येक देश आपला सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि सांघिक प्रकारासाठी सर्वश्रेष्ठ संघ निवडत असतो. अशा या आॅलिम्पिक स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने निर्विवाद वर्चस्व राखले होते. आॅलिम्पिकमध्ये हॉकी साम्राज्यावरील भारतीय संघाचा सूर्य कधी मावळणार नव्हता. १९२८ ते १९५२ या काळात भारतीय संघाने हॉकीवर अधिराज्य गाजविले. अर्थातच याचे सर्व श्रेय जाते ते मेजर ध्यानचंद, लेसली क्लाड्युअस, बलबीर सिंग सिनियर, अजितपाल सिंग, उधम सिंग, के. डी. सिंग बाबू, मोहम्मद शाहिद, शफर इक्बाल यांना. १९२८ ते १९५६ या काळात भारतीय हॉकी संघाने सलग ६ सुवर्णपदके जिंकली होती. त्यांनी सलग २४ सामने आपल्या नावावर केले होते. या काळात त्यांनी एकूण १७८ गोल केले होते. एक काळ असा होता, की महाराष्ट्राच्या धनराज पिल्लेचासुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर एक वेगळा दबदबा होता.
१९७६ नंतर मात्र भारतीय हॉकी संघाला पदक जिंकता आले नाही. पुन्हा १९८० मध्ये मॉस्को येथे भारतीय हॉकी संघाने कमाल केली. या वेळी त्यांनी सुवर्णपदकावर आपला हक्क प्रस्थापित केला. नंतर १९८४, १९८८ व १९९२ आॅलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंना कोणताच चमत्कार करता आला नाही. यानंतर भारतीय हॉकीचा सुवर्णकाळ संपत आल्यासारखे झाले होते. भारतामध्ये हॉकी मागे पडले आणि क्रिकेटने क्रीडाप्रेमींवर मोहिनी घातली. पण, आता थोडी परिस्थिती बदलली आहे. गेल्या काही वर्षांपासून भारतीय हॉकीने पुन्हा आपला दबदबा निर्माण केला आहे.
रिओ येथे होणाऱ्या आॅलिम्पिक स्पर्धेसाठी भारताच्या पुरुष व महिला संघांनी आपली प्रवेशिका निश्चित केली आहे. संघामध्ये सरदारसिंग, एस. व्ही. सुनील, आकाशदीप सिंग, रमणदीप सिंग, मनप्रीत सिंग, एस. के. उथप्पा, देविंदर वाल्मीकी आणि आपल्या संघाची चीनची भिंत असलेला गोलरक्षक पी. आर. श्रीजेश हे सर्वच खेळाडू चांगल्या बहरात आहेत. गेल्या काही महिन्यांत झालेल्या विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपल्या या खेळाडूंनी जगाला दाखवून दिले आहे, की हम भी कुछ कम नहीं. त्यामुळे भारतीय संघाकडून या वर्षी पदकाची अपेक्षा करण्यात काहीच हरकत नाही.
- शिवाजी गोरे
>५ ते २१ आॅगस्ट २०१६
भारतीय हॉकी संघाने १९२८ मध्ये अॅमस्टरडॅम येथे आपल्या देशाला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले होते. त्यानंतर १९३२ (लॉस एंजिलिस), १९३६ (बर्लिन), १९४८ (लंडन), १९५२ (हेलसिंकी) व १९५६ (मेलबर्न) हा पदकांचा सुवर्णकाळ होता. मेलबर्नमध्ये हॉकी संघाने सुवर्ण जिंकले, त्या वेळेस ध्यानचंद भारतीय संघात नव्हते. १९६० मध्ये रोम (इटली) येथे मात्र भारतीय हॉकी संघाने रौप्यपदक जिंकले. पुन्हा १९६४ मध्ये टोकिओ येथे भारतीय हॉकी संघाने सुवर्णपदकावर कब्जा केला. १९६८ मध्ये मेक्सिको येथे त्यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. १९७२ मध्ये म्युनिच येथेसुद्धा कांस्यपदकच पदरी पडले.