खेलो इंडिया पॅरा गेम्स! भालाफेक प्रकारात भाग्यश्री जाधवला सुवर्ण पदक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 08:07 PM2023-12-11T20:07:13+5:302023-12-11T20:07:49+5:30

बॅडमिंटनमध्ये आरती पाटीलने अंतिम फेरी गाठून महाराष्ट्राचे आणखी एक पदक निश्चित केले.

Gold Medal to Bhagyashree Jadhav in Javelin | खेलो इंडिया पॅरा गेम्स! भालाफेक प्रकारात भाग्यश्री जाधवला सुवर्ण पदक

खेलो इंडिया पॅरा गेम्स! भालाफेक प्रकारात भाग्यश्री जाधवला सुवर्ण पदक

नवी दिल्ली: महाराष्ट्राच्या पॅरा क्रीडापटूंनी पहिल्या खेलो इंडिया पॅरा क्रीडा स्पर्धेत जोरदार सुरुवात करताना सोमवारी ॲथलेटिक्स प्रकारात एक सुवर्ण आणि तीन रौप्य आणि तीन कांस्यपदकांची कमाई केली. बॅडमिंटनमध्ये आरती पाटीलने अंतिम फेरी गाठून महाराष्ट्राचे आणखी एक पदक निश्चित केले. ॲथलेटिक्स क्रीडा प्रकारात महिलांच्या भालाफेक प्रकारात नांदेडच्या भाग्यश्री जाधवने महाराष्ट्राला पहिले सुवर्ण पदक मिळवून दिले. ॲथलेटिक्समधील अन्य क्रीडा प्रकारात दिलीप गावीत, गीता चव्हाण, शुभम सिंगनाथ  यांनी आपापल्या शर्यतीत रौप्यपदकाची कमाई केली. 

आरतीने सुवर्ण कामगिरी करताना एफ-३३/३४ प्रकारात १३.५७ मीटर भाला फेक केली. पुरुषांच्या टी ४७ प्रकारात नाशिकचा दिलीप गावित १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत ११.४१ सेकंद वेळेसह रौप्यपदकाचा मानकरी ठरला. नागपूरच्या शुभम सिंगनाथने टी १२ या प्रकारातून १०० मीटर शर्यतीत १२.०१ सेकंद वेळ देताना रौप्यपदक मिळविले. महिलांच्या १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत मुंबईच्या गीता चव्हाणने टी ५३/५४ प्रकारात २४.८६ सेकंदासह रुपेरी यश मिळविले. अक्षय सुतार लांब  उडीतील टी १३ प्रकारात कांस्यपदकाचा मानकरी ठरला. त्याने ५.२९ मीटर उडी मारली. ऋतुजा कौटाळेने २०० मीटर शर्यतीत टी ४७ प्रकारात ३१.५३ सेकंद वेळ देताना कांस्यपदक मिळविले. 

धावपटूंची कामगिरी कौतुकास्पद - सुरेश काकड
पहिल्या पॅरा क्रीडा स्पर्धेत आंतरराष्ट्रीय धावपटू दिलीप गावित, शुभम सिंगनाथ,भाग्यश्री जाधव, गीता चव्हाण यांनी पदार्पणात सुरेख कामगिरी केली. आंतरराष्ट्रीय अनुभवाचा त्यांनी सुरेख फायदा करून घेतला. संघासाठी ही कामगिरी निश्चितच अभिमानास्पद ठरली, अशी प्रतिक्रिया संघाचे मुख्य प्रशिक्षक सुरेश काकड यांनी व्यक्त केली.

  • - खेलो इंडिया पॅरा गेम्स
  • - ॲथलेटिक्समध्ये तीन रौप्य पदकांचीही कमाई
  • - अक्षय सुतारला लांब उडीत कांस्य पदक
  • - ज्योती कौटाळेला २०० मीटरमध्ये कांस्य पदक
  • - बॅडमिंटनमध्ये आरती पाटील अंतिम फेरीत

Web Title: Gold Medal to Bhagyashree Jadhav in Javelin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.