दत्तू भोकनळने पटकावले सुवर्ण
By Admin | Updated: July 18, 2016 06:19 IST2016-07-18T06:19:14+5:302016-07-18T06:19:14+5:30
रिओ आॅलम्पिकसाठी पात्र ठरलेला तळेगावरोहीचा जवान दत्तू भोकनळ याने अमेरिकेतही यशाचा डंका कायम

दत्तू भोकनळने पटकावले सुवर्ण
नाशिक : रिओ आॅलम्पिकसाठी पात्र ठरलेला तळेगावरोहीचा जवान दत्तू भोकनळ याने अमेरिकेतही यशाचा डंका कायम राखताना आंतरराष्ट्रीय रोर्इंग (नौकानयन) स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. त्याने आधीच्या कामगिरीत सुधारणा करत सर्वोत्तम टायमिंग साधताना हे यश मिळवले.
चांदवड तालुक्यातील तळेगावरोही येथील मूळ रहिवासी असलेल्या व लष्करात जवान म्हणून कार्यरत असलेल्या दत्तू भोकनळ याने बीजिंगमध्ये असलेल्या आशियाई रोर्इंग (नौकानयन) अजिंक्यपद स्पर्धेमध्ये रौप्यपदक पटकावत आंतरराष्ट्रीय स्तरावर दबदबा निर्माण केला होता. शनिवारी पार पडलेल्या आणि २० देशाच्या खेळाडूंचा सहभाग असलेल्या आंतरराष्ट्रीय युएसए रोइंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये त्याने कामगिरीत सातत्य कायम राखतांना बाजी मारली. स्पर्धेतील अन्य सहा स्पर्धकांचे आव्हान मोडून काढतांना त्याने प्रथम क्रमांक मिळवण्यासह सुवर्णपदकावर नाव कोरले.
दत्तू भोकनळ आॅगस्ट मध्ये रिओ येथे होणाऱ्या आॅलिंपिक स्पर्धेकरता सध्या अमेरीकेत सराव करीत आहे. या निमित्त त्याने तेथे त्याने यु. एस.ए. चॅम्पियनशिप स्पर्धेत सरावाच्या दृष्टीने सहभाग नोंदवत हे घवघवीत यश संपादन केले. स्पर्धेतील दोन किलोमीटर शर्यतीचे अतंर दत्तूने सात मिनीटे दहा सेकंदांत पार करत सुवर्णपदक मिळविले. त्याला प्रशिक्षक पॉल मोखा यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या पदकाने दत्तू भोकनळ आॅलम्पिक स्पर्धेत सुवर्णपदकाचा प्रमुख दावेदार मानला जात आहे. त्याच्या या यशामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा तिरंगा फडकला आहे. त्याच्या या यशाचा आनंद नाशिक जिल्ह्याबरोबरच चांदवड तालुक्यातील तळेगावरोही येथे साजरा करण्यात आला.
दत्तू भोकनळ हा रोर्इंगपटू दि. १९ जुन रोजी अमेरिकेत आॅलिम्पिक स्पर्धेच्या सरावा निमित्त रवाना झाला. मात्र तेथील खर्च त्याला पेलवत नसल्याने तो सध्या तेथील एका भारतीय गुजराथी कुटुंबाकडे पेर्इंग गेस्ट म्हणून वास्तव्यास आहे.
दत्तू भोकनळ लष्कराच्या बॉम्बे इंजिनिअरिंग विभागामध्ये कार्यरत आहे. त्याने गेल्या वर्षी राष्ट्रीय क्रीडास्पर्धेमध्ये रोर्इंग एकेरीत सुवर्णपदक पटकाविले होते.
सैन्य दलात भरती झाल्यानंतर त्याने रोर्इंगचे प्रशिक्षण घेतले. या दरम्यान त्याने विविध स्पर्धेत सहभागी होत पदकांची कमाई केली. आॅक्टोबर २०१५ मध्ये बीजिंग येथे झालेल्या अशियाई नौकानयन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ७:१८:४१ अशी वेळ नोंदवत त्याने रौप्यपदक पटकावले. कोरिया येथे यावर्षी झालेल्या फिसा अशिया अॅण्ड ओशीयाना कॉन्टिनेंटल आॅलिम्पिक क्वॉलिफिकेशन स्पर्धेत त्याने यश मिळविले आहे.