विजयी पथ गाठण्याचे दिल्ली डेअरडेव्हिल्सचे लक्ष्य
By Admin | Updated: April 15, 2016 04:20 IST2016-04-15T04:20:01+5:302016-04-15T04:20:01+5:30
आपापले सलामीचे सामने गमावणारे दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब शुक्रवारी परस्परांविरुद्ध आयपीएल ९मध्ये खेळतील तेव्हा घरच्या मैदानावर विजयी

विजयी पथ गाठण्याचे दिल्ली डेअरडेव्हिल्सचे लक्ष्य
नवी दिल्ली : आपापले सलामीचे सामने गमावणारे दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब शुक्रवारी परस्परांविरुद्ध आयपीएल ९मध्ये खेळतील तेव्हा घरच्या मैदानावर विजयी पथावर येण्याचे दिल्लीचे डावपेच असतील.
मागच्या सत्रात तळाच्या स्थानावर राहिलेल्या दिल्ली आणि पंजाबला सलामीला विजयाची आशा होती; पण दोन्ही संघांना अनुक्रमे केकेआर आणि गुजरात लॉयन्सकडून मार खावा लागला. दिल्ली मागच्या वर्षी सातव्या स्थानावर होता. यंदा खेळाडूंच्या उत्तम समन्वयामुळे विजयी पथावर परतण्याचे मनुसबे आहेत. चॅम्पियन्स लीग टी-२०साठी दोनदा पात्र ठरलेल्या डेअरडेव्हिल्सकडे १९ वर्षांखालील संघाचा कोच राहिलेला राहुल द्रविड मेंटर म्हणून उपलब्ध आहे. पॅडी उपटनसारखे कोच आहेत. झहीरसारखा नवा कर्णधार आहे.
कोलकात्याविरुद्ध दिल्ली संघ १७.४ षटकांत ९८ धावांत गारद झाला. यामुळे झहीरची चिंता वाढली. फलंदाज चालणार नसतील, तर सामने कसे जिंकायचे, असे मत त्याने मांडले. टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात अखेरच्या षटकात सलग ४ षटकार खेचणारा कार्लोस ब्रेथवेट हादेखील लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरला. दुसरीकडे साडेआठ कोटींत खरेदी करण्यात आलेला अष्टपैलू पवन नेगी याच्याकडून आणखी सरस कामगिरीची अपेक्षा असेल.
फलंदाजीत दिल्लीसाठी केवळ क्विंटन डिकॉक, संजू सॅमसन हेच उपयुक्त खेळी करू शकले. नाथन कूल्टर नाईल, ख्रिस मॉरिस, अमित मिश्रा आणि झहीर यांच्यामुळे दिल्लीचा मारा
सक्षम वाटतो. पहिला सामना गमावल्यानंतरही झहीरने आमच्यासाठी तो खराब दिवस असल्याचे सांगून आम्ही चांगली कामगिरी करू, असा विश्वास व्यक्त केला होता. मी खेळाडूंच्या कामगिरीवर आनंदी असून, सर्वच खेळाडूंनी ऊर्जावान खेळ केला, असे म्हटले होते.
उपविजेता व सेमीफायनलिस्ट राहिलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघाला गत मोसमात तळाच्या स्थानावर राहावे लागले होते. यंदाच्या
सत्रात संघात कोणताही दिग्गज
खेळाडू नाही. (वृत्तसंस्था)
किंग्ज इलेव्हन पंजाब : डेव्हिड मिलर (कर्णधार), काईल अॅबोट, मोहित शर्मा, मिचेल जॉन्सन, ग्लेन मॅक्सवेल, मनन व्होरा, मुरली विजय, ऋषी धवन, शॉन मार्श, वृद्धिमान साहा, गुरकीरतसिंग मान, संदीप शर्मा, अक्षर पटेल, मार्क्स स्टोइनिस, निखिल नाईक, अनुरितसिंग, शार्दूल ठाकूर, फरहान बेहरदिन, के. सी. करीअप्पा, अरमान जफर, प्रदीप साहू, निखिल नाईक, मनन वोरा व स्वप्निल सिंग.
दिल्ली डेअरडेव्हिल्स : झहीर खान (कर्णधार), ख्रिस मॉरिस, महंमद शमी, नॅथन कुल्टर-नाईल, संजू सॅमसन, कार्लोस ब्रेथवेट, करुण नायर, अमित मिश्रा, क्विंटन डिकॉक, श्रेयस अय्यर, जेपी ट्युमिनी, ऋषभ पंत, मयंक अगरवाल, इम्रान ताहीर, शाहबाज नदीम, सौरभ तिवारी, एल्बी मॉर्केल, जयंत यादव, पवन नेगी, खलील अहमद, सॅम बिलिंग्ज, ख्रिस मॉरिस, चमा मिलिंद, अखिल हरवदकर, महीपाल लोमरोर, जोएल पॅरिस व पवन सुयाल.