आकाश नेवे / जळगावइंदूर : २०२० च्या टोकिओ आॅलिम्पिकमध्ये सॉफ्टबॉलचा समावेश झाला आहे. या स्पर्धेसाठी पात्रता स्पर्धा सुरू व्हायला असून दोन वर्षे अवकाश आहे. त्या काळात भारतीय संघ उभारणीचे कडवे आव्हान आहे. त्यामुळे कमी वयाचे खेळाडू आताच घडवण्यावर आमचा भर असल्याचे सॉफ्टबॉल असोसिएशन आॅफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण अनावकर यांनी स्पष्ट केले. इंदौर येथे त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.प्रश्न : आॅलिम्पिक २०२० मध्ये पुन्हा एकदा सॉफ्टबॉलचा समावेश करण्यात आला आहे. त्याकडे सॉफ्टबॉल संघटना कशा पद्धतीने पाहते?अनावकर : भारतीय सॉफ्टबॉल संघ आॅलिम्पिकसाठी पात्र ठरू शकलेला नाही. त्यामुळे यंदा प्रथम पात्रता फेरी गाठण्याचे आमचे लक्ष्य आहे. आशिया खंडात भारतीय संघाची मुख्य लढत ही चीनसोबत आहे. त्यासोबतच कोरिया, जपान, तैवान हेदेखील भारतासाठी कडवे प्रतिस्पर्धी आहेत. टॉप १० मधील चार संघ हे आशियातील असल्याने भारतीय संघासमोर पात्रता फेरीत प्रवेश मिळविण्याचे आव्हान आहे. सिडनी आॅलिम्पिकमध्ये जपानने विजय मिळवला होता. त्यासोबतच चीननेदेखील दुसरे स्थान मिळवले होते. अॅटलांटा आॅलिम्पिक ते बीजिंगपर्यंत सॉफ्टबॉलचा समावेश या स्पर्धेत केला गेला होता. मात्र मधल्या काळात हा खेळ स्पर्धेत नव्हता. प्रश्न : आता भारतीय संघाची निवड तुम्ही कशा पद्धतीने करणार? अनावकर : भारतीय संघ निवडीसाठी आमच्याकडे दोन वर्षे आहेत. या काळात संपूर्ण भारतभरातून कमी वयाचे आणि गुणवान खेळाडू निवडून त्यांच्यावर काम करण्याचे आमचे नियोजन आहे. तसेच हे राज्य सातत्याने स्पर्धांमध्ये सहभागी होतात. त्यामुळेदेखील खेळाडूंचा सराव चांगला होतो.प्रश्न : संघाच्या निवडीसाठी कमी वयातील खेळाडूंना तुम्ही कसे निवडणार? अनावकर : यापुढील दोन वर्षे आम्ही ४० मुलींवर लक्ष केंद्रित केले आहे. त्याचा फायदा संघ निवडताना नक्कीच होईल. देशभरात मुलींमध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पंजाब, दिल्ली आणि केरळ या राज्यांत १५ उत्तम खेळाडू आहेत. त्याचादेखील फायदा संघ निवड करताना होईल. पोनी सॉफ्टबॉलचा फायदा आता दिसू लागला आहे. प्रश्न : पोनी सॉफ्टबॉलचा फायदा नेमका कसा होत आहे? अनावकर : काही वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्पर्धेसाठी संघ निवडला गेल्यावर त्यांना तांत्रिक बाबींची माहिती द्यावी लागत होती. मात्र मिनी सॉफ्टबॉल अर्थात पोनीमुळे १० आणि १२ वर्षे वयोगटातील खेळाडू तयार होतात. जेव्हा ते ज्युनिअर गटात खेळण्यासाठी येतात, तेव्हा त्यांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण देता येते. त्यामुळे वरिष्ठ गटात जागतिक पातळीवर खेळताना ते कडवी टक्कर देऊ शकतात. प्रश्न : जागतिक पातळीवर काही स्पर्धांचे नियोजन आहे का?अनावकर : सार्क देशांसाठी स्पर्धा ुसुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सध्या नेपाळ, भूतान, पाकिस्तान आणि भारत हे देश खेळत आहेत. मात्र त्यासोबतच श्रीलंका आणि बांगलादेश हे दोन्ही देशदेखील खेळात कसे येतील, याबाबत त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. प्रश्न : सरकारी पातळीवर पायाभूत सुविधांबाबत काय सांगाल?अनावकर : सॉफ्टबॉलसाठी लागणारे मैदान उपलब्ध नाही. तसेच साईकडे सॉफ्टबॉलचे फक्त दोनच प्रशिक्षक उपलब्ध आहेत. असे असले तरी देशभरात या खेळाची वाढती लोकप्रियता पाहता केंद्र सरकारच्या क्रीडा मंत्रालयातर्फे टॉपमध्ये याचा समावेश करण्याबाबत चर्चा सुरू आहे. त्याबाबत आम्ही सरकारशी पत्रव्यवहारदेखील करत आहोत. आंतरराष्ट्रीय स्पर्धांत भारत कडवी टक्कर देणारभारतीय संघ येत्या काळात आशिया खंडातून पात्रता मिळवण्याचे लक्ष्य ठेवून आहे. त्यासाठी संघाला चीन, कोरिया आणि जपानचे कडवे आव्हान आहे. हे आव्हान पेलण्यासाठी खेळाडू, संघटना आणि सरकार यांनी एकत्र येणे गरजेचे आहे. सरकारने खेळाडूंना आर्थिक आणि शैक्षणिक मदत करावी.
२०२० टोकिओ आॅलिम्पिक पात्रतेचे लक्ष्य
By admin | Updated: February 23, 2017 01:04 IST