दिग्गजांचे पॅकअप
By Admin | Updated: September 8, 2014 02:36 IST2014-09-08T02:36:48+5:302014-09-08T02:36:48+5:30
क्रोएशियाच्या मॅरिन सिलिक याने फेडररला, तर जपानच्या केई निशिकोरीने जोकोव्हिचचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आणले.

दिग्गजांचे पॅकअप
न्यूयॉर्क : शनिवारची रात्र ही यूएस ओपनसाठी ऐतिहासिक आणि आश्चर्यकारक ठरली. १८वी ग्रॅँड स्लॅम पटकाविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडरर आणि जेतेपदाचा प्रबळ दावेदार सर्बियाचा नोवाक जोकोव्हिच यांना नव्या दमाच्या खेळाडूंनी घरचा रस्ता दाखविला. क्रोएशियाच्या मॅरिन सिलिक याने फेडररला, तर जपानच्या केई निशिकोरीने जोकोव्हिचचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आणले.
दहाव्या मानांकित निशिकोरीने २०११चा चॅम्पियन जोकोव्हिच याला सलग पाचव्यांदा यूएस ओपनच्या अंतिम फेरीत जाण्यापासून रोखले. निशिकोरीने ही लढत ६-४, १-६, ७-६ (७-४), ६-३ अशी जिंकून पहिला धक्कादायक निकाल लावला. या विजयाबरोबर निशिकोरीने आपल्या कारकिर्दीत पहिल्यांदा ग्रॅँड स्लॅम स्पर्धेत धडक मारली. तिसरा मानांकित स्टान वावरिंका आणि पाचवा मानांकित मिलोस राओनिक या अव्वल खेळाडूंना पराभूत केल्याने निशिकोरीचा आत्मविश्वास वाढला होता. पहिल्या सेटमध्येच त्याची झलक पाहायला मिळाली. जोकोव्हिचने पुढील सेटमध्ये आक्रमक खेळ करून सामना १-१ असा बरोबरीत आणला.
तिसरा सेट इतका चुरशीचा झाला की प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली. टायब्रेकरमध्ये रंगलेल्या या सेटमध्ये ४-० अशा पिछाडीवर असलेल्या निशिकोरीने जबरदस्त खेळ केला आणि हा सेट ७-६ असा जिंकून आघाडी मिळवली.
या धक्यातून जोकोव्हिचला सावरता आले नाही आणि एक तास ४५ मिनिटांत निशिकोरीने ही लढत जिंकली. फेडररला सिलिकने ६-३, ६-४, ६-४ असे पराभूत केले. (वृत्तसंस्था)