जर्मनीविरुद्ध अधिकाधिक पेनल्टी कॉर्नर मिळवा

By Admin | Updated: August 8, 2016 03:37 IST2016-08-08T03:37:15+5:302016-08-08T03:37:15+5:30

भारतीय हॉकी संघाचे अभिनंदन! आयर्लंडविरुद्धचा सामना जिंकून भारताने ‘रिओ मोहिमे’चा शानदार प्रारंभ केलाय. माझ्या मित्राने आॅलिम्पिक, भारतीय संघ आणि मी याबाबतचा योगायोग लक्षात आणून दिला

Get more and more penalty corners against Germany | जर्मनीविरुद्ध अधिकाधिक पेनल्टी कॉर्नर मिळवा

जर्मनीविरुद्ध अधिकाधिक पेनल्टी कॉर्नर मिळवा

धनराज पिल्ले लिहितो...
भारतीय हॉकी संघाचे अभिनंदन! आयर्लंडविरुद्धचा सामना जिंकून भारताने ‘रिओ मोहिमे’चा शानदार प्रारंभ केलाय. माझ्या मित्राने आॅलिम्पिक, भारतीय संघ आणि मी याबाबतचा योगायोग लक्षात आणून दिला... याआधी भारताने १२ वर्षांपूर्वी म्हणजेच २००४ च्या अथेन्स आॅलिम्पिकमध्ये हॉकीचा सामना जिंकला होता. तोच माझ्या कारकिर्दीतील अखेरचा सामनादेखील होता.
आयर्लंडविरुद्धच्या लढतीतील उल्लेखनीय बाब म्हणजे, भारतीय खेळाडूंची देहबोली कमालीची सकारात्मक होती. ऊर्जेने भरलेल्या आपल्या खेळाडूंनी प्रत्येक क्षेत्रात आक्रमक खेळ केला. रघुनाथने पहिल्या क्वार्टरचा खेळ संपण्याआधी केलेला गोल, तसेच ड्रॅग फ्लिकर रमणदीपने २६ व ४९ व्या मिनिटाला केलेले गोल भारतीय हॉकीप्रेमींना खचितच सुखावणारे होते.
चौथ्या क्वार्टरमध्ये मात्र भारताची बचावफळी काहीशी विस्कळित जाणवली. आपल्या बचावपटूंनी अनेक चुका केल्या. आगामी लढतींत या चुका टाळाव्या लागतील. विशेषत: जर्मनी आणि नेदरलँडसारख्या बलाढ्य संघांविरुद्ध अशा चुका आपल्या ‘रिओ मोहिमे’साठी खूप नुकसानदायक ठरू शकतात. या संघाविरुद्ध खेळताना प्रतिस्पर्ध्यांना जास्त पेनल्टी कॉर्नर मिळू नयेत, याकडे आपल्या बचावफळीने लक्ष केंद्रित करायला हवे. जर्मनी, नेदरलँडसारख्या दादा संघांविरुरुद्ध ही बाब विजयाची किल्ली ठरू शकते.
आयर्लंडला नमविल्यानंतर आता भारतासमोर जर्मनी आणि नेदरलँडचे कडवे आव्हान असेल. जर्मनीविरुद्ध भारतीयांनी नैसर्गिक खेळ करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर संघव्यवस्थापनाने अशा मोठ्या लढतीमध्ये नवीन प्रयोग करण्याचा उत्साह टाळायला हवा. या लढतीत भारतीयांनी सकारात्मक मानसिकतेने खेळायला हवे. यासाठी प्रेरणा म्हणून चॅम्पियन्स ट्रॉफीतील विश्वविजेत्या आॅस्ट्रेलियाविरुद्धची लढत त्यांनी आठवायला हवी. या लढतीत सर्वच आघाड्यांवर जगज्जेत्यांची कोंडी करण्यात आपण यशस्वी ठरलो होतो. दोन ‘हाय व्होल्टेज’ लढतींमध्ये आपले सीनियर खेळाडू सर्वस्व पणाला लावतील, याबाबत मला विश्वास आहे. भारतीय खेळाडूंनी ब्राझीलमधील वातावरणाशी स्वत:ला जुळवून घेतले असेल, अशी आशा आहे. क्रीडाग्राममध्ये राहताना जगभरातील महान खेळाडूंना भेटण्याची संधी लाभते. एका खेळाडूसाठी ही गोष्ट किती मोठी असते, हे कोणताही खेळाडू सहजपणे सांगेल. आपले खेळाडूही निश्चितपणे याचा आनंद लुटत असतील... आपल्या आवडत्या सुपरस्टार्सबरोबर ते जेवण करीत असतील, छायाचित्रे काढत असतील.
सध्या भारतीय संघात अनुभवी आणि नव्या दमाच्या खेळाडूंचे उत्कृष्ट मिश्रण आहे. हा संघ मला २००० च्या सिडनी आॅलिम्पिकमधील संघाची आठवण करून देणारा आहे. प्रत्येक संघासाठी पेनल्टी कॉर्नर मिळवणे आणि त्याचे गोलमध्ये रूपांतर करणे महत्त्वाचे असते. रघुनाथ, रूपिंदर आणि हरमनप्रीत या त्रिकुटाने आत्मविश्वासाने बेधडक खेळ करताना अधिकाधिक पेनल्टी कॉर्नरच्या संधी निर्माण करायला हव्यात. सरदार, मनप्रीत आणि इतर मिडफिल्डर्सनी गोल करण्याच्या संधी निर्माण करायला हव्यात. या संधी सार्थकी लावण्याची जबाबदारी आघाडीच्या खेळाडूंवर असेल. ‘रिओ मोहीम’ यशस्वी करण्यासाठी भारतीय संघाने प्रत्येक सामन्यात योग्य व्यूहरचना आखून उतरावे आणि सर्व खेळाडूंनी १०० टक्के योगदान देऊन ती योजना
प्रत्यक्ष मैदानावर अमलात आणावी. एका वेळी केवळ एका सामन्याचाच विचार करावा. आत्मविश्वास कायम ठेवा आणि अखेरच्या क्षणापर्यंत
सामना सोडू नका. संपूर्ण देश आपल्या हॉकी संघाच्या यशासाठी प्रार्थना करतोय. प्रत्यक्ष मैदानावर नसलो तरी, आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत. आॅल द बेस्ट!(टीसीएम)

Web Title: Get more and more penalty corners against Germany

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.