जर्मन मशीनपुढे फ्रेंच ‘ओपन’
By Admin | Updated: July 5, 2014 04:54 IST2014-07-05T04:02:31+5:302014-07-05T04:54:21+5:30
ह्युमेल्सने नोंदविलेल्या गोलच्या जोरावर जर्मनीने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत फ्रान्सची झुंज १-० ने मोडून काढली.

जर्मन मशीनपुढे फ्रेंच ‘ओपन’
उपांत्य फेरीत धडक : फ्रान्सने घालविला चान्स
रिओ दी जानेरिओ : मॅट्स ह्युमेल्सने मध्यंतरापूर्वी हेडद्वारे नोंदविलेला गोल अखेर निर्णायक ठरला. ह्युमेल्सने नोंदविलेल्या गोलच्या जोरावर जर्मनीने आज, शुक्रवारी खेळल्या गेलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत फ्रान्सची झुंज १-० ने मोडून काढली आणि फिफा विश्वकप फुटबॉल स्पर्धेत सलग चौथ्यांदा उपांत्य फेरीत धडक मारली. युरोपीयन वर्चस्वाच्या लढाईत अखेर जर्मनीने बाजी मारली. जर्मन हल्ल्यापुढे फ्रेंच संघ ‘उघडा’ पडला.
युरोपातील दोन बलाढ्य संघांदरम्यान खेळल्या गेलेल्या या लढतीत ह्युमेल्सने १३ व्या मिनिटाला गोल नोंदवीत जर्मनीला वर्चस्व मिळवून दिले. जर्मनीचा गोलकिपर मॅन्युएल नेउरची कामगिरीही उल्लेखनीय ठरली. त्याने या लढतीत अप्रतिम बचाव करताना फ्रान्सचे बरोबरी साधण्याचे प्रयत्न हाणून पाडले. नेउरने अखेरच्या क्षणालाही बचाव अभेद्य राखत जर्मनीच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. करेम बेनझेमाने डाव्या पायाने मारलेला जोरकस फटका नेउरने परतावून लावला आणि जर्मनीच्या उपांत्य फेरीतील प्रवेशावर शिक्कामोर्तब केले.
या लढतीत चेंडूवर अधिक वेळ नियंत्रण जर्मनीचे होते; पण फ्रान्सला सुरुवातीला गोल नोंदविण्याची संधी होती. सातव्या मिनिटाला बेनझेमाला गोल नोंदविण्याची संधी होती; पण त्याला गोलजाळ्याचा वेध घेता आला नाही. १३ व्या मिनिटाला ह्युमेल्सने क्रुसच्या फ्री किकवर फ्रान्सच्या बचावफळीला गुंगारा देत चेंडूला गोलजाळ्याचा मार्ग दाखविला आणि जर्मनीचे खाते उघडले. जर्मनीतर्फे मिडफिल्डमध्ये क्रुस, सॅमी केदिरा व बॅस्टियन श्वेनस्टाइगर यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली. फ्रान्सतर्फे मिथियू बालब्युनाने चांगला खेळ केला; पण जर्मनीचा गोलकिपर नेउरची भिंत भेदण्यात त्याला अपयश आले. बेनझेमानेने जर्मनीची बचावफळी भेदण्याचा प्रयत्न केला. रिअल माद्रिदच्या या स्ट्रायकरने पॉल पोग्बाच्या पासवर गोल करण्याचा प्रयत्न केला. त्याने मारलेला फटका नेउरच्या हातात विसावला. मध्यंतरानंतर फ्रान्सने तुल्यबळ खेळ केला. अंतोइने ग्रिएजमॅन, वालब्युना व बेनझेमा यांनी चांगल्या चाली रचल्या; पण त्यांना गोलजाळ्याचा वेध घेता आला नाही. जर्मनी १३ व्यांदा उपांत्य फेरी गाठण्यात यशस्वी ठरला. फ्रान्समध्ये १९९८ साली उपांत्यपूर्व फेरीत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर जर्मनीने सलग चौथ्यांदा उपांत्य फेरीत धडक मारण्याचा पराक्रम केला. (वृत्तसंस्था)
13 व्या मिनिटाला टोनी क्रुपच्या फ्री किकवर मॅटस ॅह्युमेल्सचा हेडर गोलरक्षक हुगो लोरेस याला चकवून गोल जाळ्यात विसावला.
‘विश्वचषक’ची अफलातून
विश्वचषक फुटबॉल स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली असताना तिचा ज्वरही वाढू लागला आहे. या स्पर्धेत बाद फेरीत पोहोचलेल्या आठ संघांचा अफलातून योगायोग समोर आला आहे. या स्पर्धेत अर्जेंटिना विरुद्ध बेल्जियम (ए विरुद्ध बी), ब्राझील विरुद्ध कोलंबिया (बी विरुद्ध सी), कोस्टारिका विरुद्ध डच (नेदरलँड) आणि फ्रान्स विरुद्ध जर्मनी (एफ विरुद्ध जी) अशा बाद फेरीच्या लढती होणार आहेत. या अनोख्या एबीसीडीची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे.