गेलचा द्विशतकी झंझावात

By Admin | Updated: February 25, 2015 03:40 IST2015-02-25T01:19:05+5:302015-02-25T03:40:35+5:30

ख्रिस गेलच्या विक्रमी द्विशतकी खेळी, मर्लाेन सॅम्युअल्सची नाबाद शतकी खेळीनंतर गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्याच्या जोरावर वेस्ट इंडिजने मंगळवारी ‘

Gayle's twin thunderstorms | गेलचा द्विशतकी झंझावात

गेलचा द्विशतकी झंझावात

कॅनबेरा : ख्रिस गेलच्या विक्रमी द्विशतकी खेळी, मर्लाेन सॅम्युअल्सची नाबाद शतकी खेळीनंतर गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्याच्या जोरावर वेस्ट इंडिजने मंगळवारी ‘ब’ गटात खेळल्या गेलेल्या लढतीत झिम्बाब्वेचा डकवर्थ लुईस नियमाच्या आधारावर ७३ धावांनी पराभव केला आणि विश्वकप स्पर्धेत सलग दुसरा विजय नोंदविला. गेलने द्विशतकी खेळी करीत सूर गवसल्याचे सिद्ध करताना प्रतिस्पर्धी संघांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
खराब फॉर्ममुळे टीकाकारांचे लक्ष्य ठरलेल्या गेलने १४७ चेंडूंना सामोरे जाताना २१५ धावांची खेळी केली. त्यात १० चौकार व १६ षटकारांचा समावेश आहे. गेलने मर्लोन सॅमुअल्सच्या (नाबाद १३३) साथीने दुसऱ्या विकेटसाठी वन-डे क्रिकेटमधील विक्रमी भागीदारी नोंदविली. त्यामुळे वेस्ट इंडिजने या लढतीत २ बाद ३७२ धावांची दमदार मजल मारली. प्रत्युत्तरात झिम्बाब्वेने संघर्षपूर्ण खेळ केला, पण मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना त्यांचा डाव ४४.३ षटकांत २८९ धावांत संपुष्टात आला. झिम्बाब्वेच्या डावाच्या सुरुवातीला पावसाने हजेरी लावल्यामुळे खेळ थांबविण्यात आला. त्यानंतर दोन षटके कमी करण्यात आली. त्यामुळे झिम्बाब्वेपुढे ४८ षटकांत ३६३ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले.
झिम्बाब्वेतर्फे सीन विलियम्सन (७६) आणि क्रेग इर्व्हिन (५२) यांनी अर्धशतकी खेळी केली. यष्टिरक्षक फलंदाज ब्रेन्डन टेलरने रेफरलवर बाद होण्यापूर्वी ३७ धावांची आकर्षक खेळी केली. आजचा दिवस मात्र गेलचाच होता. फलंदाजीमध्ये विक्रमी कामगिरी करणाऱ्या गेलने गोलंदाजीमध्ये कमाल करताना ६ षटकांत ३५ धावांच्या मोबदल्यात २ विकेट घेतल्या. कर्णधार जेसन होल्डर व जेरोम टेलर यांनी प्रत्येकी ३ विकेट घेतल्या. विंडीज संघाचा तीन सामन्यांतील हा दुसरा विजय आहे; तर झिम्बाब्वे संघाचा तीन सामन्यांतील हा दुसरा पराभव आहे. गेल वन-डे क्रिकेटमध्ये द्विशतकी खेळी करणारा चौथा फलंदाज ठरला. गेलने विश्वकप स्पर्धेत सर्वाधिक वैयक्तिक धावांचा विक्रम नोंदवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या वेस्ट इंडिज संघाची सुरुवात निराशाजनक झाली. ड्वेन स्मिथ (०) डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर माघारी परतला. गेलने पहिल्या ५० धावा ५१ चेंडंूत पूर्ण केल्या; तर १०५ चेंडूंमध्ये त्याने शतक पूर्ण केले. वन-डे क्रिकेटमधील हे त्याचे २२ वे शतक ठरले. त्यानंतरच्या ५० धावा त्याने २१ चेंडूंत पूर्ण केल्या. गेलने १५० ते २०० धावांचा पल्ला गाठण्यासाठी केवळ १२ चेंडू खेळले. त्याने १३८ चेंडूंमध्ये आपले पहिले द्विशतक पूर्ण केले.

Web Title: Gayle's twin thunderstorms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.