गंगपूर, साईची आगेकूच
By Admin | Updated: April 23, 2015 02:45 IST2015-04-23T02:45:31+5:302015-04-23T02:45:31+5:30
राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत गंगपूर ओडिशाने भोपाळला पराभूत करीत उपांत्य फेरीत आपली जागा जवळपास निश्चित केली आहे. स्पोर्ट अथॉरीटी आॅफ इंडियाने

गंगपूर, साईची आगेकूच
पुणे : राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत गंगपूर ओडिशाने भोपाळला पराभूत करीत उपांत्य फेरीत आपली जागा जवळपास निश्चित केली आहे. स्पोर्ट अथॉरीटी आॅफ इंडियाने (साई) ओडिशाला बरोबरीत रोखत आगेकूच केली. झारखंड, मध्यप्रदेश हॉकी अॅकॅडमीने आपापल्या गटातील प्रतिस्पर्ध्यांना पराभूत केले.
म्हाळुंगे-बालेवाडी येथील क्रीडा संकुलात ‘अ’ गट हॉकी अजिंक्य स्पर्धा सुरु आहे. स्पर्धेतील ‘ब’ गटात गंगपूर ओडिशाने भोपाळचा ५-२ असा सहज पराभव करीत आगेकूच केली. गंगपूरकडून प्रताप लाक्रा (४, ४२ मि), अमरदीप एक्का (२९ मि), दीपक लाक्रा (४३ मि), रोशन मिंझ (५५ मि) यांनी गोल करीत संघाला शानदार विजय मिळवून दिला. भोपाळकडून आफताब खान (२६ मि), मोबीन उर रेहमान (४५ मि) गोल करण्यात यशस्वी झाले. मध्यंतरापर्यंत गंगपूरकडे २-१ अशी आघाडी होती.
याच गटात झारखंडने पिछाडीवरुन इंडियन युनिव्हर्सिटीज संघाला २-१ अशी मात दिली. सामन्याच्या ३० व्या मिनिटास युनिव्हर्सिटीज संघाच्या हरसाहिब सिंग याने गोल करीत संघाला आघाडी मिळवून देत पूर्वाधातील खेळावर वर्चस्व राखले. उत्तरार्धात झारखंडच्या दीपक कुजुर (३६ मि), अरविंद कुजुर (५४ मि) यांनी गोल करीत संघाला विजय मिळवून दिला. स्पर्र्धेच्या ‘अ’ गटात मध्यंतरापर्यंत ३-१ अशी भक्कम आघाडी असतानाही ओडिशाला साई विरुद्ध ३-३ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले. ओडीशाकडून दिलीप टोप्पो (१५ मि), ईर्शाद मिर्झा (२२ मि), अभिषेक सिंग (२५ मि) यांनी, तर साई संघाकडून जगत नचाप्पा (२६ मि), पवन कुमार (३९ मि), बसवराज (५४ मि) गोल करण्यात यशस्वी ठरले.
याच गटात मध्यप्रदेश हॉकी अॅकॅडमीने विकास चौधरी (२० व ५९ मि), निक्की कौशल (४६ मि) यांच्या गोलच्या जोरावर आंध्रप्रदेशवर ३-० असा सहज विजय मिळविला.