गंभीरचे पुनरागमन
By Admin | Updated: May 29, 2014 04:29 IST2014-05-29T04:29:53+5:302014-05-29T04:29:53+5:30
अनुभवी सलामीवीर गौतम गंभीर याचे इंग्लंड दौर्यासाठी टीम इंडियात बुधवारी पुनरागमन झाले.

गंभीरचे पुनरागमन
मुंबई : अनुभवी सलामीवीर गौतम गंभीर याचे इंग्लंड दौर्यासाठी टीम इंडियात बुधवारी पुनरागमन झाले. जूनच्या अखेरच्या आठवड्यापासून सुरू होणार्या कसोटी दौर्यासाठी अष्टपैलू स्टुअर्ट बिन्नी आणि जलद गोलंदाज पंकजसिंग यांचीही १८ सदस्यीय संघात आश्चर्यकारकरित्या निवड करण्यात आली. जखमी जहीर खान, हरभजनसिंग आणि प्रज्ञान ओझा यांना मात्र बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्टÑीय निवड समितीची येथे प्रदीर्घ मिटिंग चालली. त्यानंतर बीसीसीआय सचिव संजय पटेल यांनी संघाची घोषणा केली. यावेळी बांगला देशात १५, १७ आणि १९ जून रोजी खेळल्या जाणार्या तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेसाठी सुरेश रैना याच्या नेतृत्वाखालील १५ सदस्यीय संघ निवडण्यात आला. या दौर्यासाठी नियमित कर्णधार महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा, फिरकी गोलंदाज आर. अश्विन तसेच अष्टपैलू रवींद्र जडेजा यांना विश्रांती देण्याचा निर्णय समितीने घेतला. बांगला देशात झालेल्या आशिया चषकाच्यावेळी रैना भारतीय संघात नव्हता हे विशेष. जम्मू काश्मीरचा अष्टपैलू खेळाडू परवेझ रसूल आणि आयपीएलमध्ये धावांचा पाऊस पाडणारा रॉबिन उथप्पा यांना वन-डे मालिकेसाठी संधी देण्यात आली आहे. याशिवाय महाराष्टÑाचा फलंदाज केदार जाधव आणि गुजरातचा डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेल यांनाही स्थान मिळाले आहे. भारताचा इंग्लंड दौरा २६ जूनपासून सुरू होत असून तो ७ सप्टेंबर रोजी संपणार आहे. या दौर्यात पाच कसोटी, पाच वन-डे आणि एक टी-२० सामना खेळला जाईल. रणजी सामन्यात ४५ बळी घेणारा राजस्थानचा वेगवान गोलंदाज पंकजसिंग याला कसोटी संघात स्थान देण्यात आले. दुसरीकडे बिन्नीच्या निवडीवर आश्चर्य होत असताना निवडकर्र्यांनी मात्र इंग्लंडमधील परिस्थितीत त्याचा मध्यम जलद मारा प्रभवी ठरेल या आशेवर स्थान दिले. या संघात ईशांतसह सात जलद तर दोनच फिरकी गोलंदाज आहेत. फलंदाजीत गंभीर, मुरली विजय, शिखर धवन, चेतेश्वर पूजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा यांची फळी असून धोनीला बॅकअप करण्यासाठी रिद्धिमान साहा याची दुसरा यष्टिरक्षक म्हणून निवड झाली. वीरेंद्र सेहवागकडे मात्र साफ दुर्लक्ष करण्यात आले. १८ जणांच्या संघात इंग्लंडमध्ये खेळण्याचा अनुभव असलेले धोनी, ईशांत आणि गंभीर हे तिघेच आहेत. (वृत्तसंस्था)