‘गेल वादळा’चे थैमान!
By Admin | Updated: May 7, 2015 03:35 IST2015-05-07T03:35:08+5:302015-05-07T03:35:08+5:30
चौकार नव्हे, तर षटकारांची आतषबाजी करीत ख्रिस गेल नावाच्या वादळाने बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर थैमान घातले.

‘गेल वादळा’चे थैमान!
बंगळुरू : चौकार नव्हे, तर षटकारांची आतषबाजी करीत ख्रिस गेल नावाच्या वादळाने बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर थैमान घातले. अवघ्या ५७ चेंडूंत ११७ धावांची खेळी करणाऱ्या ख्रिस गेलने किंग्स इलेव्हन पंजाबच्या गोंलदाजांना धो-धो धुतले. त्याची ‘विराट’ खेळी आणि त्यानंतर स्टार्क आणि एस. अरविंद यांचे प्रत्येकी ४ बळी यांच्या जोरावर बेंगलोरने पंजाबचा १३८ धावांनी पराभव केला. बंगळुरूने पंजाबविरुद्ध ३ बाद २२६ धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात, पंजाबचा डाव अवघ्या ८८ धावांवर संपुष्टात आला.
पंजाबकडून अक्षर पटेलने सर्वाधिक नाबाद ४० धावांची खेळी केली.त्याने २१ चेंडूंत ५ चौकार आणि २ षटकार ठोकले. वृद्धिमान साहाने १३ धावा केल्या. इतर फलंदाज सपशेल अपयशी ठरले. त्यांना द्विअंकी धावसंख्या गाठता आली नाही. स्टार्क आणि एस. अरविंदच्या प्रत्येकी चार बळींमुळे पंजाबची स्थिती दयनिय झाली. त्यांचा डाव अवघ्या १३.४ षटकांत संपुष्टात आला. त्याआधी, यंदाच्या आयपीएल सत्रातील गेलची आजची सर्वांत मोठीखेळी ठरली. त्याने १२ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने ११७ धावा केल्या. एबी डिव्हिलियर्सने नाबाद ४७ धावांची खेळी करीत योगदान दिले. किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार जॉर्ज बेलीने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. बेलीचा हा निर्णय चांगलाच अंगलट आला. तो आरसीबीच्या सलामीवीरांनी खोटा ठरवला. कर्णधार विराट कोहली आणि पुनरागमन करणारा ख्रिस गेल यांनी दणक्यात सुरुवात करून दिली. त्यानंतर डिव्हिलियर्सने सूत्रे स्वीकारली. त्याने ४ चौकार आणि ३ षटकार खेचत महत्त्वपूर्ण नाबाद ४७ धावा केल्या. त्याच्या योगदानामुळे आरसीबीला २२६ धावांचा डोंगर उभारण्यास मदत झाली. दिनेश कार्तिकने ८ तर सर्फराज खानने नाबाद ११ धावा केल्या. पंजाबकडून संदीप शर्माने सर्वांधिक २ तर अक्षर पटेलने एक गडी बाद केला. किंग्स इलेव्हन पंजाबने सेहवागच्या जागी मनन वोहराला संधी दिली. (वृत्तसंस्था)
> गेल आणि विराट या जोडीने अवघ्या २५ चेंडूंत संघाचे अर्धशतक गाठले. यामध्ये गेलच्या तब्बल ४२ धावा होत्या. तर विराटच्या केवळ ८. एका बाजूने गेल चौकार आणि षटकारांची आतषबाजी करीत होता, तर दुसऱ्या बाजूने विराट कोहली त्याला ‘स्ट्राईक’ देण्याचे काम करीत होता. या जोडीचा चांगलाच ताळमेळ जुळला.
> गेलने अवघ्या २२ चेंडंूत अर्धशतक पूर्ण केले. यात ४ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता. या जोडीने धावांचा सपाटा सुरूच ठेवला.
> अवघ्या ५८ चेंडूंत त्यांनी संघाचे शतक गाठले. यामध्ये गेलच्या ६६ तर विराटच्या ३१ धावांचा समावेश होता. संघ सुस्थितीत आल्यानंतर विराट कोहली संदीप शर्माच्या चेंडूवर त्रिफळाचित झाला. तोपर्यंत या जोडीने त्यांची कामगिरी बजावली होती.
> विराटने २० चेंडूंत ३ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३२ धावा केल्या. विराट बाद झाल्यानंतर एबी डिव्हिलियर्सने गेलसोबत जोडी जमवली. त्यांनी दुसऱ्या गड्यासाठी ७१ धावांची भागीदारी केली. त्याआधी, गेलने ४६ चेंडूंत शतक पूर्ण केले.
> गेल आणि डिव्हिलियर्सने २२ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी केली. उत्तुंग षटकार ठोकणारा गेल अखेर अक्षर पटेलच्या चेंडूवर बाद झाला. अक्षरनेच हा झेल टिपला.
टी-२०मध्ये गेल...
२०३ सामने टी-२०मध्ये २००५ ते २०१५ पर्यंतच्या सत्रात ख्रिस गेलने खेळले आहेत.
७३३२ एकूण धावा आतापर्यंत त्याच्या नावे आहेत.
१७५* धावांची विशेष खेळी ही सर्वाधिक आहे.
१४ शतके गेलने टी-२० क्रिकेटमध्ये आणि ४७ अर्धशतके झळकाविली आहेत.
५१४ षटकार व ५७५ चौकार आतापर्यंत गेलने ठोकले आहेत. चौकारांच्या तुलनेत षटकारांचा विचार केला तर त्याला ‘सिक्सर किंग’ का म्हणतात हे स्पष्ट होते.
धावफलक
रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू : ख्रिस गेल गो. व झे. पटेल ११७, विराट कोहली त्रि. गो. संदीप शर्मा ३२, एबी डिव्हिलियर्स नाबाद ४७, दिनेश कार्तिक त्रि. गो. संदीप शर्मा ८, सर्फराज खान नाबाद ११; अवांतर : ११; एकूण : ३ बाद २२६; गोलंदाजी : संदीप शर्मा ४-०-४१-२, मिशेल जॉन्सन ४-०-४३-०, अनुरितसिंग ४-०-२५-०, ग्लेन मॅक्सवेल २-०-२३-०, अक्षर पटेल ४-०-५-१, करणवीर सिंग २-०-४१-०.
किंग्ज इलेव्हन पंजाब : मुरली विजय त्रि. गो. हर्षल पटेल २, मनन व्होरा झे. वीस गो. स्टार्क २, वृद्धिमान साहा झे. कोहली गो. अरविंद १३, ग्लेन मॅक्सवेल त्रि. गो. अरविंद १, डेव्हिड मिलर त्रि. गो. अरविंद ७, जॉर्ज बेली त्रि. गो. अरविंद २, अक्षर पटेल नाबाद १२, मिशेल जॉन्सन त्रि. गो. स्टार्क १, अनुरितसिंग त्रि. गो. स्टार्क ०, करणवीर सिंग त्रि. गो. स्टार्क ४, संदीप शर्मा गो. व झे. चहल ७; अवांतर : ९; एकूण : १३.४ षटकांत सर्व बाद ८८; गोलंदाजी : मिशेल स्टार्क ४-०-१५-४, श्रीनाथ अरविंद ४-०-२७-४, हर्षद पटेल २-०-१३-१, यजुवेंद्र चहल २.४-०-२४-१. डेव्हिड वीस १-०-४-०.