सराव सामन्यातही फुस्सऽऽ

By Admin | Updated: February 9, 2015 03:32 IST2015-02-09T03:32:22+5:302015-02-09T03:32:22+5:30

विश्वकप स्पर्धा प्रारंभ होण्यास केवळ सहा दिवसांचा अवधी शिल्लक असताना गतविजेत्या भारतीय संघाला मात्र अद्याप पराभवाचे दृष्टचक्र भेदता आलेले नाही.

Fuser in practice match | सराव सामन्यातही फुस्सऽऽ

सराव सामन्यातही फुस्सऽऽ

अ‍ॅडिलेड : विश्वकप स्पर्धा प्रारंभ होण्यास केवळ सहा दिवसांचा अवधी शिल्लक असताना गतविजेत्या भारतीय संघाला मात्र अद्याप पराभवाचे दृष्टचक्र भेदता आलेले नाही. आॅस्ट्रेलिया दौऱ्यात विजयाचे खाते उघडण्यात अपयशी ठरलेल्या भारतीय संघाला रविवारी विश्वकप स्पर्धेपूर्वी खेळल्या गेलेल्या सराव सामन्यातही पराभवाला सामोरे जावे लागले. विश्वकप स्पर्धेला आठवड्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक असताना भारतीय संघावर आता सावर रे... म्हणण्याची वेळ आली आहे. डेव्हिड वॉर्नर व ग्लेन मॅक्सवेल यांनी गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतल्यानंतर मिशेल जॉन्सन अँड कंपनीपुढे फलंदाज सपशेल अपयशी ठरल्यामुळे टीम इंडियाला सराव सामन्यात आॅस्ट्रेलियाविरुद्ध १०६ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
आॅस्ट्रेलियाने नाणेफेक जिंंकून प्रथम फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय घेतला. वॉर्नरने ८३ चेंडूंमध्ये १०४ धावांची खेळी करीत संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर मॅक्सवेलने रिटायर्ड आऊट होण्यापूर्वी ५७ चेंडूंमध्ये १२२ धावांची आक्रमक खेळी केली. आॅस्ट्रेलियाचा डाव ४८.२ षटकांत ३७१ धावांत संपुष्टात आला. लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय फलंदाज पुन्हा एकदा अपयशी ठरले. शिखर धवनने (५९) सूर गवसल्याचे संकेत दिले, तर अजिंक्य रहाणेने (६६) कामगिरीत सातत्य राखले. अंबाती रायडूने (५३) काही अप्रतिम फटके मारले, पण भारताचा डाव ४५.१ षटकांत २६५ धावांत संपुष्टात आला. या लढतीत उभय संघांना १५ खेळाडूंना खेळविण्याची संधी होती, पण फलंदाजी किंवा गोलंदाजी केवळ ११ खेळाडूंना करता येणार होती.
१४ फेब्रुवारीपासून प्रारंभ होणाऱ्या विश्वकप स्पर्धेपूर्वी भारतासाठी गोलंदाजी हा चिंतेचा विषय आहेच, पण आघाडीचे फलंदाज अपयशी ठरल्यामुळे भारतीय संघाची अडचण आणखी वाढली आहे. फिटनेस चाचणीत यशस्वी ठरल्यानंतर पहिली लढत खेळणारा रोहित शर्मा (८) याला मोठी खेळी करता आली नाही. जोश हेजलवूडच्या उसळी घेणाऱ्या चेंडूवर कट करण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला.
धवनने खेळपट्टीवर जम बसविण्यासाठी पुरेसा वेळ घेतला, पण त्याची साथ देण्यासाठी खेळपट्टीवर आलेला विराट कोहली (१८) एक-दोन चांगले फटके मारुन मिशेल स्टार्कचे लक्ष्य ठरला. धवन व रहाणे यांनी त्यानंतर तिसऱ्या विकेटसाठी १५.३ षटकांत १०४ धावांची भागीदारी करीत डाव सावरला, पण त्यानंतर २७ धावांच्या अंतरात या दोन फलंदाजांव्यतिरिक्त सुरेश रैना (९), कर्णधार महेंद्रसिंग धोनी (०) आणि स्टुअर्ट बिन्नी (५) हे पाच फलंदाज गमाविल्यामुळे भारताची ७ बाद १८५ अशी अवस्था झाली. रायडूने ४२ चेंडूंमध्ये चार चौकार व चार षट्कार ठोकले, पण त्याची खेळी केवळ पराभवातील अंतर कमी करणारी ठरली. जडेजाने २० धावा फटकाविल्या.
त्याआधी वॉर्नरने सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा स्वीकारताना शतकी खेळी साकारली. त्याने ८४ चेंडूंमध्ये १४ चौकार व २ षट्कार ठोकले. उमेश यादव (९ षटकांत ५२ धावा व २ बळी) काहीअंशी आॅस्ट्रेलियन फलंदाजांना रोखण्यात यशस्वी ठरला. स्टुअर्ट बिन्नीने (१-४१) अ‍ॅरोन फिंचला (२०) बाद करीत भारताला सुरुवातीला यश मिळवून दिले, पण वॉर्नरला रोखण्यात भारतीय गोलंदाज सपशेल अपयशी ठरले. ईशांतच्या स्थानी संघात समावेश करण्यात आलेल्या मोहित शर्माने (२-६२) शेन वॉटसन (२२) याला तंबूचा मार्ग दाखविला. उमेश यादवने स्टिव्हन स्मिथला (१) बाद करीत आॅस्ट्रेलियाच्या धावगतीवर अंकुश राखला. (वृत्तसंस्था)

Web Title: Fuser in practice match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.