जर्मनीपुढे फ्रेंच चॅलेंज

By Admin | Updated: July 4, 2014 06:01 IST2014-07-04T06:01:20+5:302014-07-04T06:01:20+5:30

टीकाकारांचे लक्ष्य ठरलेल्या जर्मनी संघाला फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत उद्या, शुक्रवारी माराकाना स्टेडियममध्ये फ्रान्सच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार

French challenge before Germany | जर्मनीपुढे फ्रेंच चॅलेंज

जर्मनीपुढे फ्रेंच चॅलेंज

रिओ दी जानेरो : टीकाकारांचे लक्ष्य ठरलेल्या जर्मनी संघाला फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत उद्या, शुक्रवारी माराकाना स्टेडियममध्ये फ्रान्सच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. युरोपमधील दोन अव्वल संघादरम्यान खेळल्या जाणाऱ्या या लढतीच्या निमित्ताने चाहत्यांना रंगतदार खेळ बघण्याची संधी मिळणार आहे. ही लढत जर्मनीचे प्रशिक्षक जोकिम लोऊ यांच्यासाठी अग्निपरीक्षा ठरणार आहे. विश्वचषक स्पर्धेत लौकिकाला साजेशी कामगिरी करता न आलेला जर्मनीचा संघ टीकाकारांचे लक्ष्य ठरला आहे.
लोऊ यांनी २००६ च्या विश्वचषक स्पर्धेनंतर संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली. लोऊ म्हणाले, ‘डिडिएर डेसचॅम्पस यांनी २०१० नंतर फ्रान्स संघाचे स्वरूप बदलले. उद्या उभय संघादरम्यान रंगतदार लढत होईल.’
पोर्तुगालविरुद्ध सलामीला साखळी सामन्यात ४-० ने विजय मिळविल्यानंतर जगातील अव्वल संघांमध्ये समावेश असल्याचे सिद्ध केले; पण त्यानंतर निराशाजनक कामगिरीमुळे लोऊच्या मार्गदर्शनाखालील संघ टीकेचे लक्ष्य ठरला आहे. घानाविरुद्ध २-२ ने बरोबरीवर समाधान मानावे लागलेल्या जर्मनी संघाने अमेरिका संघाविरुद्ध १-० ने विजय मिळविला. सोमवारी उपउपांत्यपूर्व फेरीत अल्जेरियाविरुद्ध अतिरिक्त वेळेत २-१ ने संघर्षपूर्ण विजय मिळवित जर्मनी संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरला. माजी कर्णधार मायकल बलाक, ओलिव्हर कान आणि लोथार मथाऊस यांनी प्लेमेकर मेसूर ओजिलला संधी देण्याच्या लोऊ यांच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले. लोऊने जर्मन एफए डीएफबीसोबत जून २०१६ पर्यंतचा करार केला आहे; पण उपांत्यपूर्व फेरीत पराभव स्वीकारावा लागला, तर लोऊ यांच्यावर राजीनाम्याचा दबाव वाढेल. लोऊ यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने गेल्या तीन प्रतिष्ठेच्या स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली आहे.
दुसरीकडे कोच डेसचॅम्प्सच्या मार्गदर्शनाखाली फ्रान्स संघाच्या कामगिरीचा आलेख उंचावणारा आहे. २०१०मध्ये दक्षिण आफ्रिकेत निराशाजनक कामगिरी करणारा फ्रान्सचा संघ आता वेगळा भासत आहे. करीम बेनजेमा सर्वोत्तम फॉर्मात आहे. १९९८मध्ये मायदेशात विजेतेपदाला गवसणी घालणारा फ्रान्सचा संघ पुन्हा एकदा विजेतेपद पटकाविण्यास उत्सुक आहे; पण सध्या सर्व लक्ष जर्मनी संघावर केंद्रित झालेले आहे. (वृत्तसंस्था)
जर्मनीचा संघ सध्या आक्रमक खेळासाठी योग्य ताळमेळ शोधण्यास संघर्ष करीत आहे, तर डेसचॅम्प्सच्या मते फ्रान्स संघाचा ताळमेळ चांगला आहे. विजयासाठी फ्रान्स संघ सर्वस्व झोकून देण्यासाठी सज्ज आहे.

Web Title: French challenge before Germany

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.