माजी कसोटीपटू हेमंत कानिटकर यांचे निधन
By Admin | Updated: June 11, 2015 00:48 IST2015-06-11T00:48:33+5:302015-06-11T00:48:33+5:30
माजी कसोटीपटू हेमंत कानिटकर यांचे मंगळवारी येथे दीर्घ आजाराने ७२व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी आणि हृषीकेश व आदित्य ही मुले आहेत.

माजी कसोटीपटू हेमंत कानिटकर यांचे निधन
पुणे : माजी कसोटीपटू हेमंत कानिटकर यांचे मंगळवारी येथे दीर्घ आजाराने ७२व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी आणि हृषीकेश व आदित्य ही मुले आहेत.
कानिटकरांनी यष्टिरक्षक आणि आघाडीचे फलंदाज म्हणून भारतातर्फे दोन कसोटी सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले होते. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यांची कारकीर्द चांगलीच गाजली होती. १९६३-६४मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटच्या पदार्पणाच्या सामन्यातच कानिटकर यांनी सौराष्ट्राविरुद्ध शतक झळकावले होते. रणजी स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा मान त्यांनी दोन वेळा पटकावला.
१९७०-७१च्या रणजी स्पर्धेत कानिटकरांच्या खेळामुळे महाराष्ट्राने अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती. त्यामुळे मायदेशातील वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी त्यांना भारतीय संघात स्थान मिळाले होते.
वेस्ट इंडीजविरुद्ध १९७४-७५मध्ये त्यांनी दोन कसोटी सामने खेळले होते. बंगळुरू येथे पदार्पणाच्या कसोटीत क्लाईव्ह लॉईड यांच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या विंडीज संघात लान्स गिब्ज, अँडी रॉबटर््ससारखे दर्जेदार गोलंदाज असताना कानिटकर यांनी ६५ धावांची झुंजार खेळी केली होती. त्यानंतरच्या तीन डावांमध्ये मात्र त्यांना फारसे यश आले नाही. १९६३मध्ये त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
त्यानंतर १९७८पर्यंत त्यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. जवळपास दीड दशकाच्या कारकिर्दीत कानिटकर यांनी ४२.७९च्या सरासरीने ५,००७ धावा केल्या. यात १३ शतकांचा समावेश आहे. त्यांचा मुलगा हृषीकेश कानिटकर यानेही दोन कसोटी आणि ३४ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांचा दुसरा मुलगा आदित्य हा गोल्फ प्रशिक्षक आहे. (क्रीडा प्रतिनिधी)