माजी क्रिकेट खेळाडूंना आर्थिक लाभाची घोषणा
By Admin | Updated: November 8, 2015 23:38 IST2015-11-08T23:38:06+5:302015-11-08T23:38:06+5:30
बीसीसीआयने देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय स्तरावरील माजी खेळाडूंसाठी आर्थिक लाभाची घोषणा केली आहे. ज्यात मासिक आणि एकरकमी लाभ दिला जाणार आहे

माजी क्रिकेट खेळाडूंना आर्थिक लाभाची घोषणा
मुंबई : बीसीसीआयने देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय स्तरावरील माजी खेळाडूंसाठी आर्थिक लाभाची घोषणा केली आहे. ज्यात मासिक आणि एकरकमी लाभ दिला जाणार आहे. बीसीसीआयच्या वार्षिक बैठकीच्या एक दिवस आधी ही घोषणा केली आहे.
बीसीसीआयने क्रिकेटपटूंसोबतच पंचांनाही मानधन देण्याची घोषणा केली आहे. बीसीसीआयने म्हटले आहे की, सगळ्या कसोटी खेळाडूंना जे ३१ डिसेंबर १९९३ पूर्वी निवृत्त झाले आहेत आणि २५ पेक्षा अधिक कसोटी खेळले आहेत, त्यांना दर महिन्याला ५० हजार रुपये देण्यात येतील. ज्यांनी २५ पेक्षा कमी कसोटी सामने खेळले, त्यांना ३७ हजार ५०० व जे १ जानेवारी १९९४ नंतर निवृत्त झाले आहेत त्यांना २२ हजार ५०० रुपये दर महिन्याला देण्यात येतील.
ज्या खेळाडू आणि पंचांचे निधन झाले आहे, त्यांच्या पत्नीला ही रक्कम देण्यात येणार आहे. ज्या खेळाडूंनी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले, त्यांना १५ हजार रुपये देण्यात येतील; तसेच ज्या रणजी खेळाडूंनी १९५७-५८ च्या सत्राच्या आधी कमीत कमी १० सामने खेळले, त्यांना १५ हजार रुपये देण्यात येतील. ज्या खेळाडूंनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २००३-०४ च्या सत्राच्या शेवटापर्यंत २५ ते ४९ सामने खेळले आहेत. त्यांनाही १५ हजार रुपये, ५० ते ७४ सामने खेळणाऱ्यांना २२ हजार ५०० रुपये आणि ७५ पेक्षा अधिक सामने खेळणाऱ्या खेळाडूंना ३० हजार रुपये दर महिन्याला दिले जाणार आहेत. महिला खेळाडूंनी दहा किंवा त्यापेक्षा अधिक कसोटी सामने खेळले, त्यांना २२ हजार ५०० रुपये आणि ५ ते ९ कसोटी सामने खेळणाऱ्यांना १५ हजार रुपये दिले जाणार आहेत.