फुटबॉलपटूंना हवे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2015 00:01 IST2015-10-14T00:01:54+5:302015-10-14T00:01:54+5:30
‘‘भारतात फुटबॉल खेळ रुजविण्यासाठी शाळा व क्लब पातळीवर लक्ष देणे गरजेचे आहे. त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण केल्या पाहिजेत

फुटबॉलपटूंना हवे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण
कोलकाता : ‘‘भारतात फुटबॉल खेळ रुजविण्यासाठी शाळा व क्लब पातळीवर लक्ष देणे गरजेचे आहे. त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण केल्या पाहिजेत. त्याच्या जोडीला चांगल्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रशिक्षणासाठी परदेशांत पाठविले पाहिजे. यासाठी मीदेखील मदत करीन,’’ असे आश्वासन ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांनी येथे व्यक्त केले.
इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेतील एटलेटिको डी कोलकाता संघाच्या कोलकाता येथे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कोलकाता संघाचा मालक व भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली या वेळी उपस्थित होता.
भारतात फुटबॉलचा विकास करण्यास भरपूर वाव आहे. उत्तम प्रशिक्षण व पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी आवश्यक प्रयत्न केले पाहिजेत.
भारतात चांगले युवा खेळाडू आहेत; मात्र त्यांचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलचा अनुभव तोकडा पडतो. या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाची ओळख करून दिली पाहिजे. यासाठी खेळाडूंना परदेशात प्रशिक्षणासाठी पाठवावे लागेल, असे पेले म्हणाले.
आज ब्राझीलची फुटबॉलमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख आहे. १९५०मध्ये ब्राझील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचा यजमान होता; मात्र त्यात घरच्या मैदानावरच संघाला पराभवाचे तोंड पाहावे लागले. चहूबाजूंनी टीकेची झोड उठविण्यात आली होती. अशा वेळी आपल्याला संयम ठेवावा लागेल. भारतातही फुटबॉलचा विकास होईल; मात्र त्यासाठी काही वेळ देण्याची गरज असल्याचे पेले यांनी स्पष्ट केले.