‘डेथ ओव्हर’वर लक्ष : मोहमंद शमी

By Admin | Updated: October 13, 2014 06:25 IST2014-10-13T06:25:02+5:302014-10-13T06:25:02+5:30

सरावादरम्यान डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी केलेल्या मेहनतीचा सकारात्मक निकाल मिळत असल्याचे

Focusing on 'Death Over': Mohammed Shami | ‘डेथ ओव्हर’वर लक्ष : मोहमंद शमी

‘डेथ ओव्हर’वर लक्ष : मोहमंद शमी

नवी दिल्ली : सरावादरम्यान डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी केलेल्या मेहनतीचा सकारात्मक निकाल मिळत असल्याचे मत वेस्ट इंडीजविरुद्ध पहिल्या दोन्ही सामन्यांत अचूक मारा करणाऱ्या मोहम्मद शमीने व्यक्त केले.
शमीने कोचीमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या वन-डे लढतीत ६६ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले होते, तर शनिवारी त्याने फिरोजशाह कोटला मैदानावरील सामन्यात ३३ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. शमीने ड्वेन स्मिथचा महत्त्वाचा बळी घेत भारताच्या विजयाची मजबूत पायाभरणी केली.
शमी म्हणाला, ‘काही विशिष्ट परिस्थितीमध्ये गोलंदाजी करण्यासाठी सरावादरम्यान खूप मेहनत घेतली. सराव सत्रात एका विशिष्ट क्षेत्रात गोलंदाजी करण्याचा सराव करतो. अचूक यॉर्कर करण्यासाठी सरावादरम्यान यष्टीपुढे बूट ठेवून सराव केला. त्यामुळे सामन्यादरम्यान अचूक यॉर्कर टाकण्यासाठी मदत मिळाली. डेथ ओव्हरमध्ये यश मिळविण्यासाठी गोलंदाजांच्या भात्यात ‘अचूक यॉर्कर’ हे अस्त्र असणे आवश्यक आहे.’
शमी पुढे म्हणाला, ‘डेथ ओव्हरमध्ये क्षेत्ररक्षणानुसार गोलंदाजी करणे आवश्यक असते. त्यात यश मिळाले तर फलंदाजांना धावा फटकाविण्यास अडचण भासते. गोलंदाजी करताना क्षेत्ररक्षण व चेंडूचा टप्पा यावर लक्ष केंद्रित करावे लागले. याव्यतिरिक्त रिव्हर्स स्विंगची भूमिका महत्त्वाची ठरते. रिव्हर्स स्विंगवर फटकेबाजी करणे सोपे नसते. डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करताना अडचण भासत नाही.’ (वृत्तसंस्था)

Web Title: Focusing on 'Death Over': Mohammed Shami

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.