फिक्सिंगचा डर्टी गेम २00८ फिक्सिंग
By Admin | Updated: May 22, 2014 05:32 IST2014-05-22T05:32:14+5:302014-05-22T05:32:14+5:30
न्यूझीलंडचा कर्णधार आणि कोलकाता नाईट रायडर्सचा तत्कालीन खेळाडू ब्रँडन मॅक्युलम याने आपल्याला लाच देण्याचा प्रयत्न झाला होता अशी माहिती आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाला दिली

फिक्सिंगचा डर्टी गेम २00८ फिक्सिंग
मुंबई : क्रिकेटला लागलेला कलंक स्पॉट फिक्सिंक प्रकरणाने पुन्हा डोके वर काढले असून न्यूझीलंडचा कर्णधार आणि कोलकाता नाईट रायडर्सचा तत्कालीन खेळाडू ब्रँडन मॅक्युलम याने आपल्याला लाच देण्याचा प्रयत्न झाला होता अशी माहिती आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाला दिली असल्याचे आता उघड झाले आहे. २00८ च्या स्पर्धेतील या घटनेबाबतचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले असले तरी आयसीसीने मात्र मॅक्युलम चौकशीच्या फेर्यात नसल्याचे स्पष्ट केले आहे. गुप्त अहवाल फुटला कसा, या प्रकरणाची चौकशी स्वत: करण्याचा निर्णयदेखील आयसीसीने घेतला. चौकशी पथकाला मॅक्युलमने सांगितले की, युवा अवस्थेतील माझा आयकॉन असलेला आणि नंतर माझा मित्र बनलेला आमच्या संघातील एका खेळाडूने मला २00८ साली आयपीएलमध्ये फिक्सिंग करण्यासाठी लाच देवू केली होती. आयपीएलमध्ये कमी धावांत बाद झाल्यास त्याला प्रत्येक सामन्यासाठी १.६ कोटी रुपये देवू असा हा खेळाडू मॅक्युलमला म्हणाला होता. अर्थात मॅक्युलमने ही आॅफर नाकारली आणि कधीही फिक्सिंग केले नाही असे संबधित वृत्तात म्हंटले आहे. मॅक्युलमने आपल्या जबाबत उल्लेख केलेला खेळाडू न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू ख्रिस के्रन्स असल्याचे मानण्यात येत आहे. आयसीसीचे सीईओ डेव्ह रिचर्डसन यांनी याबाबत माहिती दिली. न्यूझीलंडच्या राष्टÑीय संघातील तीन खेळाडूंची आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने फिक्सिंगसंदर्भात चौकशी केल्याचे वृत्त गत डिसेंबरमध्ये न्यूझीलंड मीडियाने प्रकाशित केले होते. मागच्या आठवड्यात मात्र ब्रिटिश मीडियाने न्यूझीलंडचा माजी खेळाडू ल्यू व्हिन्सेंट याने आयसीसीला दिलेल्या साक्षीतील काही तथ्य प्रकाशित केले. या तपासातील काही महत्त्वाची माहिती मीडियाने लिक केल्याबद्दल आयसीसीने संताप व्यक्त केल्याचे रिचर्डसन म्हणाले. न्यूझीलंडचा कर्णधार ब्रेंडन मॅक्यूलम याच्याबाबत कुठलाही तपास सुरू नसल्याचे स्पष्ट करीत रिचर्डसन पुढे म्हणाले, की मीडियाने कुणाच्या माध्यमातून हे वृत्त प्रकाशित केले, त्याचा आता शोध घेतला जात आहे. भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रयत्न करीत असलेले सर्वच जण या प्रकाराबद्दल निराश झाले आहेत. मॅक्यूलम हा आयसीसीच्या तपास कक्षेत नाही. मात्र, ज्यांनी माहिती उघड केली, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. आम्ही या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, चौकशी पथकात अनेक क्रिकेटपटू, तसेच तपास संस्थांचा समावेश आहे. पण यासाठी कोण जबाबदार आहे, हे सध्या तरी सांगता येणार नाही. (विशेष प्रतिनिधी)