फाईव्ह नेशन्स...वन गोल..!
By Admin | Updated: October 6, 2016 04:53 IST2016-10-06T04:53:46+5:302016-10-06T04:53:46+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून साकार झालेल्या १७ वर्षांखालील ‘ब्रिक्स’ फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन बुधवारी मोठ्या थाटात करण्यात आले.

फाईव्ह नेशन्स...वन गोल..!
पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून साकार झालेल्या १७ वर्षांखालील ‘ब्रिक्स’ फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन बुधवारी मोठ्या थाटात करण्यात आले. फाईव्ह नेशन्स...वन गोल ही स्पर्धा गीत घेउन आलेली ही स्पर्धा बांबोळी मैदानावर सुरु झाली. फुटबॉल हा गोवेकरांच्या हृदयात आहे. ब्राझील, चीन, भारत, रशिया, दक्षिण आफ्रिका या पाच देशांचा समावेश असलेल्या या स्पर्धेसाठी गोवा हे सर्वाेत्तम ठिकाण आहे, असे गौरोदगार केंद्रीय क्रीडा मंत्री विजय गोएल यांनी काढले. देशातील पहिल्या ‘ब्रिक्स’ स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते उपस्थित होते. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, दिल्लीचे शिक्षण मंत्री मनिष सिसोदिया, केंद्रीय क्रीडा सचिव राजीव यादव, ब्रिक्स स्पर्धेचे सीईओ भल्ला, गोव्याचे उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा तसेच इतर राज्यांचे मंत्री उपस्थित होते.
यावेळी पार्सेकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही या स्पर्धेचे यजमानपद गोव्याला बहाल केले. फुटबॉल हा गोव्याचा राज्य खेळ आहे. या खेळाला अधिक लोकप्रियता मिळावी तसेच आगमी १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धा डोळ्यासमोर ठेउत या स्पर्धेकडे अधिक गांभीर्याने पाहिल्या जात आहे. पाचही देशांना एकत्र आणण्याचे काम या खेळाने केले आहे. त्यामुळे खेळ हा एक नवा धर्म म्हणून पुढे येत आहे. ब्रिक्सची पहिली स्पर्धा गोव्यात होत आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. देशातील उदयोन्मुख खेळाडू पाहण्याची संधी गोवेकरांना मिळत आहे, त्याचा फायदा घ्यावा, असे आवाहनही पार्सेकर यांनी यावेळी केले.
गोएल म्हणाले, मिशन इलेव्हन ही नवी संकल्पना आगामी १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून राबविल्या जात आहे. केंद्र सरकारनेही फुटबॉल अधिक प्राथमिकता देण्याचे ठरविले आहे. (क्रीडा प्रतिनिधी)
विश्वचषकापूर्वी होणारी ही स्पर्धा अत्यंत महत्वाची मानल्या जात आहे. या स्पर्धेतून भविष्यातील युवा खेळाडू देशाला मिळतील. गोवा हे फुटबॉलसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे ही स्पर्धा गोव्यात खेळविण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न होता. (क्रीडा प्रतिनिधी)