वर्ल्ड नंबर वनचा पराभव करुन श्रीकांत इंडोनेशियन ओपनच्या फायनलमध्ये
By Admin | Updated: June 17, 2017 19:01 IST2017-06-17T19:01:30+5:302017-06-17T19:01:30+5:30
किदंबी श्रीकांतने जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या सन वॅन हो ला पराभवाचा धक्का दिला.

वर्ल्ड नंबर वनचा पराभव करुन श्रीकांत इंडोनेशियन ओपनच्या फायनलमध्ये
ऑनलाइन लोकमत
जकार्ता, दि. 17 - जागतिक बॅडमिंटन स्पर्धांमध्ये मागच्या काही काळापासून सर्वोत्तम कामगिरी करत असलेल्या किदंबी श्रीकांतने जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या सन वॅन हो ला पराभवाचा धक्का दिला. या विजयासह श्रीकांतने शनिवारी 10 लाख अमेरिकन डॉलरचे पारितोषिक असलेल्या इंडोनेशियन सुपर सीरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिमफेरीत प्रवेश केला.
21-15, 18-21 आणि 24-22 अशा तीन सेटमध्ये श्रीकांतने विजय मिळवला. 1 तास 12 मिनिटे हा सामना चालू होता. यापूर्वी चार वेळा श्रीकांत आणि सन वॅन हो समोरासमोर आले होते. चारही वेळा कोरियाच्या सन वॅनने श्रीकांतला पराभूत केले होते. पण यावेळी श्रीकांतने बाजी उलटवली.
जागतिक क्रमवारीत 22 व्या स्थानावर असलेल्या श्रीकांतचा 47 व्या स्थानावर असलेल्या साकाय बरोबर अंतिम सामना होणार आहे. श्रीकांत चौथ्यांदा सुपर सीरीजच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. श्रीकांतने याआधी चायना ओपन आणि इंडियन ओपनचे विजेतेपद मिळवले आहे.