फेडरर-राओनिकमध्ये लढत
By Admin | Updated: January 10, 2016 04:37 IST2016-01-10T04:37:25+5:302016-01-10T04:37:25+5:30
अव्वल मानांकित स्वीत्झर्लंडच्या रॉजर फेडररने डोमेनिक थिएमचे आव्हान सहजपणे मोडीत काढताना ब्रिस्बेन इंटरनॅशनल टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.

फेडरर-राओनिकमध्ये लढत
ब्रिस्बेन : अव्वल मानांकित स्वीत्झर्लंडच्या रॉजर फेडररने डोमेनिक थिएमचे आव्हान सहजपणे मोडीत काढताना ब्रिस्बेन इंटरनॅशनल टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता त्याची विजेतेपदाची लढत कॅनडाच्या मिलोस राओनिक याच्याशी होणार आहे.
वर्षातील पहिली ग्रँडस्लॅम ओपनवर कब्जा करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या फेडररने दुसऱ्या दिवशी उपांत्य फेरीत आॅस्ट्रियाचा प्रतिभाशाली डोमेनिक थिएम याचे आव्हान ६-१, ६-४ असे सहज मोडीत काढताना त्याला सलग सेटमध्ये पराभूत केले. पूर्ण लढतीदरम्यान फेडररने वर्चस्व राखताना प्रतिस्पर्धी खेळाडूला डोके वर काढण्याची उसंतच मिळू दिली नाही आणि शानदार सर्व्हिस करताना अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.
अंतिम फेरीत त्याची गाठ आठव्या मानांकित राओनिक याच्याशी पडणार आहे. त्याआधी राओनिक याने संघर्षपूर्ण उपांत्य फेरीच्या लढतीत त्याच्याच देशाचा खेळाडू आॅस्ट्रेलियाच्या बर्नाड टॉमिक याचा ७-६, ७-६ असा पराभव करीत अंतिम फेरी गाठली. जागतिक क्रमवारीतील १४ वा मानांकित राओनिक आणि टॉमिक यांच्यातील लढतीत जबरदस्त चुरस पाहायला मिळाली. टायब्रेकपर्यंत खेचल्या गेलेल्या लढतीत अखेर राओनिक याने बाजी मारली.