फिफाचे सात अधिकारी अटकेत

By Admin | Updated: May 28, 2015 01:39 IST2015-05-28T01:39:51+5:302015-05-28T01:39:51+5:30

अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारीदाखल आणि त्यांच्या आग्रहावरून झुरिच येथे बुधवारी पहाटे फिफाच्या सात फुटबॉल अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली.

FIFA seven officials detained | फिफाचे सात अधिकारी अटकेत

फिफाचे सात अधिकारी अटकेत

जिनेव्हा : अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारीदाखल आणि त्यांच्या आग्रहावरून झुरिच येथे बुधवारी पहाटे फिफाच्या सात फुटबॉल अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली. स्वीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अधिकाऱ्यांवर कोट्यवधी डॉलरची लाच स्वीकारल्याचा संशय आहे. ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने वृत्ताला दुजोरा दिला.
स्वित्झर्लंडच्या न्याय मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ‘अटक झालेल्यांमध्ये लाचखोर संशयित खेळ मीडिया आणि खेळांना प्रोत्साहन देणाऱ्या कंपनीचे प्रतिनिधी, कथित फुटबॉल अधिकारी, फिफाचे प्रतिनिधी आणि फिफाच्या उपसमितीच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. दहा कोटींपेक्षा अधिक डॉलर रकमेची लाच स्वीकारल्याचा या सर्वांवर संशय आहे. या मोबदल्यात लॅटिन अमेरिकेत होणाऱ्या फुटबॉल स्पर्धेशी संबंधित माहिती, मीडिया, मार्केटिंग आणि प्रायोजन अधिकार प्राप्त केल्याचे मानले जात आहे. अमेरिकेच्या आग्रहावरून १९९० च्या दशकापासून आतापर्यंत लाच स्वीकारून माहिती पुरविल्याचा सात अधिकाऱ्यांवर आरोप ठेवण्यात आला. या अधिकाऱ्यांना प्रत्यारोपण पूर्ण होईस्तोवर कोठडीत ठेवण्यात आले आहे. अटक केलेल्यांमध्ये राफेल एसक्विवेल, कोस्टा तकास, जेफ्री वेब, एडवर्डाे ली, युगेनियो फिगुएरेडो, ज्युलिओ रोचा, जोस मारिया मारिन यांचा समावेश आहे.
लाचेचीही रक्कम अमेरिकेच्या बँकेतून पाठविण्यात आल्याचीदेखील शंका आहे. स्थानिक झुरिच पोलिसांनी शहरातील मोठ्या हॉटेलमधून सर्वांना ताब्यात घेतले. फिफाला सद्यस्थितीवर स्पष्टीकरण हवे आहे; पण अटक झालेल्यांबद्दल काहीच बोलायचे नाही, असे फिफाच्या प्रवक्त्याने सांगितले.
फिफा अध्यक्ष सॅप ब्लेटर हे नव्या कार्यकाळासाठी दावेदारी सादर करण्याच्या दोन दिवसआधी ही घटना घडली. ज्या सात लोकांना ताब्यत घेण्यात आले, त्यात फिफा उपाध्यक्षांचादेखील समावेश आहे. उद्या येथे होणाऱ्या समारंभाची हे सर्व जण तयारी करीत होते. या सर्वांना अमेरिकेच्या सुपूर्द करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. एकूण १४ जणांवर भ्रष्टाचाराचे आरोप असून, त्यातील नऊ जण फुटबॉल अधिकारी असल्याचे अमेरिकेच्या अधिकाऱ्यांचे मत आहे. अन्य एका प्रकरणात स्वित्झर्लंड पोलिसांनी २०१८ च्या विश्वचषकाच्या यजमानपदाची धुरा रशियाला आणि २०२२ चे यजमानपद कतारला देण्यासंदर्भात चौकशीसाठी फिफा मुख्यालयातून फाइल्स तसेच ई मेल्स ताब्यात घेतले. या स्पर्धांसाठी २०१० साली फिफामध्ये मतदान झाले. त्या वेळी मोठ्या प्रमाणावर अफरातफर झाल्याचा आरोप होता. आयोजन स्थळ बदलण्याचा मात्र प्रश्नच नसल्याचे फिफाच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले.
प्रवक्ते वॉल्टर डी ग्रेगोरियो म्हणाले,‘ब्लाटर यांचा या प्रकाराशी संबंध नाही. अध्यक्षपदाची निवडणूक पूर्वनिर्धारित कार्यक्रमानुसार शुक्रवारी होईल. फुटबॉलमधील घाण संपविण्यासाठी हे सकारात्मक पाऊल असून आम्ही स्वागत करतो.
हे पाचव्यांदा फिफा अध्यक्ष बनतील, असे मानले जात आहे. पण, या घटनेमुळे त्यांच्या बाजूने मतदान करणाऱ्यांच्या संख्येत घट होण्याची शक्यतादेखील आहे. अध्यक्षपदाच्या शर्यतीत ब्लाटर यांच्या विरोधात असलेले फिफा उपाध्यक्ष प्रिन्स अली बिन अल हुसेन यांनी या घटनेबद्दल प्रतिक्रिया देताना ‘फुटबॉलसाठी दु:खद दिवस’ असे संबोधले. फिफाची प्रतिमा सुधारायची असेल, तर सध्याच्या नेतृत्वात बदल होणे आवश्यक असल्याची भूमिका प्रिन्स अली आणि युरोपियन फुटबॉल महासंघाच्या प्रमुखांनी घेतली. (वृत्तसंस्था)

 

Web Title: FIFA seven officials detained