आजपासून हॉकी वर्ल्ड लीग फायनलचा थरार
By Admin | Updated: November 27, 2015 00:40 IST2015-11-27T00:40:48+5:302015-11-27T00:40:48+5:30
छत्तीसगड येथील सरदार वल्लभाई स्टेडियमवर आज, शुक्रवारपासून ६ डिसेंबर दरम्यान हॉकी वर्ल्ड लीग फायनलचा थरार रंगणार आहे.

आजपासून हॉकी वर्ल्ड लीग फायनलचा थरार
रायपूर : छत्तीसगड येथील सरदार वल्लभाई स्टेडियमवर आज, शुक्रवारपासून ६ डिसेंबर दरम्यान हॉकी वर्ल्ड लीग फायनलचा थरार रंगणार आहे. भारत, जर्मनीसह जगातील अव्वल ८ संघ यात सहभागी होत आहेत.
अर्जेंटिना व जर्मनीत झालेल्या उपांत्य स्पर्धेनंतर जगातील दिग्गज संघ या स्पर्धेच्या निमित्ताने समोरासमोर येत असून, हॉकीतील राजा कोण? याचे उत्तर यातून मिळणार आहे. या स्पर्धेत सहभागी सर्व संघ आॅलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरले असून, त्यांच्या तयारीच्या दृष्टीने ही स्पर्धा महत्त्वाची आहे. या स्पर्धेत यजमान भारत गट ‘ब’मध्ये असून, आज अर्जेंटिनाशी भारताची लढत होणार आहे. तर याच गटात जर्मनी व हॉलंड या संघांचा देखील समावेश आहे.
हॉलंड आपल्या किताबाचा बचाव करण्यासाठी स्पर्धेत उतरेल. त्यांच्या संघात मिडफील्डर रॉबर्ट वानडर हार्स्ट, स्ट्राइकर जेरॉन हर्ट्जबर्गर असून संरक्षण फळीची धुरा मिक वानडर वीर्डेन यांच्यावर असेल. हॉलंडला जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेल्या भारतासह तिसऱ्या स्थानी असलेल्या जर्मनी व अर्जेंटिनाचे कडवे आव्हान असेल. तोबियास हाउके, मारित्ज फस्टे , ख्रिस्तोफर, पान एम यांच्यासारखे दिग्गज खेळाडू जर्मनी संघात असतील.
दुसरीकडे ‘अ’ गटात विश्वचॅम्पियन आस्ट्रेलिया, बेल्जियम, ब्रिटेन व कॅनडा संघ आहे. क्रमवारीत चौथ्या स्थानी असले तरी सध्या बहरात असलेल्या आॅस्ट्रेलियाला विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे.