फेडरर, वावरिंका सहज विजयासह दुसऱ्या फेरीत
By Admin | Updated: May 25, 2015 01:31 IST2015-05-25T01:29:44+5:302015-05-25T01:31:41+5:30
कारकीर्दीतील ६४ व्या ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत खेळत असलेला रॉजर फेडरर व त्याचा मायदेशातील सहकारी स्टेनिसलास वावरिंका यांनी रविवारी आपापल्या

फेडरर, वावरिंका सहज विजयासह दुसऱ्या फेरीत
पॅरिस : कारकीर्दीतील ६४ व्या ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत खेळत असलेला रॉजर फेडरर व त्याचा मायदेशातील सहकारी स्टेनिसलास वावरिंका यांनी रविवारी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध सहज विजयाची नोंद करीत आजपासून प्रारंभ झालेल्या फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
दुसरे मानांकन प्राप्त फेडररने कोलंबियाच्या अलेक्सांद्रो फालाचा ६-३, ६-३, ६-४ ने पराभव केला आणि रोला गॅरोवर आपल्या दुसऱ्या व एकूण १८ व्या ग्रॅण्डस्लॅम विजेतेपदासाठी शानदार सुरुवात केली. फेडररचा फालाविरुद्ध सलग आठवा विजय आहे. फेडररला पुढच्या फेरीत स्पेनच्या मार्सेल ग्रनोलर्स व जर्मनीचा मॅथियास बाचिंगर यांच्यादरम्यानच्या लढतीतील विजेत्या खेळाडूच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
२०१२ चा चॅम्पियन फेडररने सेंटर कोर्टवर पाऊल ठेवल्यानंतर चाहत्यांनी त्याचे उभे राहून स्वागत केले. पहिल्या सेटमध्ये एकवेळ स्कोअर ३-३ असा बरोबरीत होता. पण त्यानंतर फेडररने सलग तीन गेम जिंकत पहिल्या सेटमध्ये सरशी साधली. फेडररने दुसऱ्या सेटमध्ये शानदार सुरुवात केली. तिसऱ्या गेममध्ये फालाची सर्व्हिस भेदली व त्यानंतर नवव्या गेममध्ये ब्रेक पॉर्इंट घेत सामन्यात २-० अशी आघाडी घेतली. फालाने तिसऱ्या सेटमध्ये संघर्षपूर्ण खेळ केला. उभय खेळाडूंदरम्यान ४-४ अशी बरोबरी होती. पण त्यानंतर फेडररने पुढील दोन्ही गेम जिंकत विजयावर शिक्कामोर्तब केले.
स्वित्झर्लंडच्या स्टॅनिसलास वावरिंकाने तुर्कीच्या मार्सेल इलहानचा ६-३, ६-२, ६-३ ने पराभव करीत दुसरी फेरी गाठली. पुरुष विभागातील अन्य सामन्यात २२ व्या मानांकित जर्मनीच्या फिलिप कोलश्रायबरने जपानच्या सोएदाचा ६-१, ६-०, ६-२ ने धुव्वा उडवला. पण रशियाच्या मिखाइल युज्नीला पहिल्या फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. रोला गॅरोमध्ये २०१० ला उपांत्यपूर्व फेरी गाठणाऱ्या युज्नीने बोस्नियाच्या दामीर दजुमुर विरुद्धच्या लढतीत दोन सेट गमावल्यानंतर माघार घेतली. (वृत्तसंस्था)