फेडरर, शारापोव्हा चौथ्या फेरीत
By Admin | Updated: May 30, 2015 01:49 IST2015-05-30T01:49:57+5:302015-05-30T01:49:57+5:30
स्वीत्झर्लंडचा रॉजर फेडरर, स्टान वावरिंका आणि गत चॅम्पियन मारिया शारापोव्हा, अॅना इव्हानोविच यांनी फ्रेंच ओपनच्या चौथ्या फेरीत मजल मारली,

फेडरर, शारापोव्हा चौथ्या फेरीत
पॅरिस : स्वीत्झर्लंडचा रॉजर फेडरर, स्टान वावरिंका आणि गत चॅम्पियन मारिया शारापोव्हा, अॅना इव्हानोविच यांनी फ्रेंच ओपनच्या चौथ्या फेरीत मजल मारली, तर फ्रान्सच्या अनेक खेळाडूंनी पुढील फेरीत प्रवेश मिळवताना ३२ वर्षांत प्रथमच विजेतेपद मिळवण्याची आशा उंचावली.
द्वितीय मानांकित २00९ चा चॅम्पियन फेडररने तिसऱ्या फेरीत बोस्नियानच्या दामिर झुम्हूरचा ६-४, ६-३ आणि ६-२ ने पराभव केला. यंदा या स्पर्धेत रोलँड गॅरोस मैदानावर रॉजरने सर्वच म्हणजे ९ सेटही जिंकले आहेत.त्याची लय बघता तो आपल्या कारकीर्दीतील १८ व्या ग्रॅण्डस्लॅम विजेतेपदासाठी आगेकूच करीत असल्याचे दिसते.
माजी आॅस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन वावरिंकाने अमेरिकेच्या स्टीव्ह जॉन्सनला पराभूत केले, तर सिमोनने फ्रान्सच्याच निकोलस माहूतला पराभूत केले.
महिला गटात मारिया शारापोव्हा हिने आॅस्ट्रेलियाच्या सामंथा स्टोसूरचा पराभव करीत अंतिम १६ मध्ये स्थान मिळवले. जागतिक क्रमवारीतील द्वितीय मानांकित शारापोव्हाने ६-३, ६-४ असा विजय मिळवला. आता तिची लढत झेक प्रजासत्ताकच्या १३ व्या मानांकित लुसी सफारोव्हा हिच्याशी होईल.
विम्बल्डनमध्ये उपांत्य फेरीत धडक मारलेल्या गास्केतने येथे अर्जेंटिनाच्या कार्लोस बर्लोक याला ३-६, ६-३, ६-१, ४-६, ६-१ असे पराभूत केले. आता तो दक्षिण आफ्रिकेच्या केव्हिन अँडरसन याच्याविरुद्ध खेळेल. रशियाच्या तैमुराज गाबाश्विली याने झेक प्रजासत्ताकच्या लुकास रसूल याचा ६-४, ६-४, ६-४ असा पराभव केला.(वृत्तसंस्था)
अॅना इव्हानोविच चौथ्या फेरीत
महिला गटात सर्बियाच्या सातव्या मानांकित अॅना इव्हानोविच हिने क्रोएशियाच्या अमानांकित डोना वेकिच हिचा ६-0, ६-३ असा पराभव करीत चौथी फेरी गाठली.