आनंदाच्या उत्साहात फॉल्कनरने उतरविले कपडे!
By Admin | Updated: March 31, 2015 23:36 IST2015-03-31T23:36:48+5:302015-03-31T23:36:48+5:30
विश्वचषक जिंकल्यानंतर आॅस्ट्रेलियन खेळाडूंनी जल्लोषी पार्टी केली. या पार्टीत अष्टपैलू जेम्स फॉल्कनरने आपले कपडे उतरविले होते,

आनंदाच्या उत्साहात फॉल्कनरने उतरविले कपडे!
मेलबोर्न : विश्वचषक जिंकल्यानंतर आॅस्ट्रेलियन खेळाडूंनी जल्लोषी पार्टी केली. या पार्टीत अष्टपैलू जेम्स फॉल्कनरने आपले कपडे उतरविले होते, अशी माहिती एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करणाऱ्या यष्टिरक्षक ब्रॅड हॅडिनने दिली. रविवारी झालेल्या सामन्यात आॅस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा सात गड्यांनी पराभव करीत विश्वचषक जिंकला होता. या विजयानंतर खेळाडूंनी रात्रभर आनंदोत्सव केला. याची माहिती हॅडिनने एका संकेतस्थळास दिली. त्यात त्याने सांगितले, की पार्टीत जेम्स फॉल्कनरने कपडे उतरवले होते. तो फोटो माझ्याकडे आहे; पण तो तुम्हाला दाखवू शकत नाही. माझ्यासोबत त्या वेळी प्रशिक्षकही होते आणि त्यांच्या हातात विश्वचषक होता, असे असतानाही ते काहीच बोलले नाहीत. माझ्यासोबत हेजलवूडसुद्धा होता. ज्यांनी ३० वर्षांत कधीही मद्याला हातसुद्धा लावला नाही. त्यांच्यासमोर प्यायला आम्हाला एका वाईट स्वप्नासारखे वाटत होते. तरीही आम्ही विश्वचषक जिंकल्याचा आनंद साजरा केला.
दरम्यान, न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गुप्तिल आणि ग्रांट इलियट बाद झाल्यानंतर आवश्यकतेपेक्षा जास्त जल्लोष आणि खेळाडूंच्या व्यवहाराबाबत हॅडिन म्हणाला, की त्यांनी साखळी फेरीतील सामन्यात आमच्यासोबत चुकीचा व्यवहार केला होता. त्यामुळे आम्ही ते बाद होण्याची वाटच बघत होतो. त्यामुळे अंतिम सामन्यात त्यांना लक्ष्य करण्याची आम्ही संधीच बघत होतो.
त्यामुळे आम्ही ते बाद झाल्यानंतर अतिउत्साह दाखवला. (वृत्तसंस्था)