वेगवान धावपटू धरमवीरवर ८ वर्षांची बंदी
By Admin | Updated: November 18, 2016 00:23 IST2016-11-18T00:23:56+5:302016-11-18T00:23:56+5:30
हरियाणाचा वेगवान धावपटू धरमवीरसिंग याच्यावर राष्ट्रीय डोपिंगविरोधी संस्थेने (नाडा) आठ वर्षांची बंदी घातली आहे.

वेगवान धावपटू धरमवीरवर ८ वर्षांची बंदी
नवी दिल्ली : डोप चाचणीत ऐनवेळी अपयशी ठरताच रिओ आॅलिम्पिकला अनुपस्थित राहिलेला हरियाणाचा वेगवान धावपटू धरमवीरसिंग याच्यावर राष्ट्रीय डोपिंगविरोधी संस्थेने (नाडा) आठ वर्षांची बंदी घातली आहे.
२०० मीटर शर्यतीचा धावपटू असलेला धरमवीर याला ११ जुलै रोजी बंगळुरू येथे झालेल्या इंडियन ग्रॅन्डप्रिक्सदरम्यान झालेल्या डोप चाचणीत दोषी धरण्यात आले होते.
धरमवीर दुसऱ्यांदा डोपिंगमध्ये दोषी आढळल्याने नाडाच्या शिस्तपालन समितीने त्याच्यावर आठ वर्षे बंदीचा निर्णय घेतला आहे. याची माहिती अ. भा. अॅथलेटिक्स फेडरेशन आणि वाडाला देण्यात आली असल्याचे नाडाच्या सृूत्रांनी स्पष्ट केले. याआधी २०१२ मध्ये अनिवार्य डोप टेस्ट देण्यास टाळाटाळ करणाऱ्या धरमवीरकडून आंतरक्षेत्रीय चॅम्पियनशिपमध्ये जिंकलेले १०० मीटरचे सुवर्णपदक हिसकावून घेण्यात आले होते.
धरमवीरने इंडियन ग्रॅन्डप्रिक्समध्ये २०० मीटर शर्यत राष्ट्रीय विक्रमासह २०.४५ सेकंदांत जिंकली. त्याची कामगिरी गेल्या काही महिन्यांपासून चांगली नसल्याने ही वेळ पाहताच शंकेची पाल चुकचुकली होती.
राष्ट्रीय शिबिरात सहभागी होण्याऐवजी धरमवीरने रोहतक येथे आपल्या कोचच्या मार्गदर्शनात सराव सुरू केला होता. (वृत्तसंस्था)