जोकोविच आणि मरे समोरासमोर
By Admin | Updated: November 8, 2015 23:42 IST2015-11-08T23:42:29+5:302015-11-08T23:42:29+5:30
अग्रमानांकित नोवाक जोकोविच आणि दुसऱ्या नामांकन मिळालेला ब्रिटनचा अॅण्डी मरे पॅरीस मास्टर्स स्पर्धेच्या अंतिम सामन्यात समोरासमोर येणार आहे.

जोकोविच आणि मरे समोरासमोर
पॅरीस : अग्रमानांकित नोवाक जोकोविच आणि दुसऱ्या नामांकन मिळालेला ब्रिटनचा अॅण्डी मरे पॅरीस मास्टर्स स्पर्धेच्या अंतिम सामन्यात समोरासमोर येणार आहे.
पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत जोकोविचने स्वित्झरर्लंडच्या स्टॅनिसलास वावरिंकाला तीन सेटच्या संघर्षात ६-३, ३-६, ६-० ने हरवले. मरेने स्पेनच्या डेविड फेरर याला ६-४, ६-३ असे सरळ सेटमध्ये पराभूत केले आणि अंतिम फेरीत प्रवेश केला.
पॅरीस मास्टर्स हा या सत्रातील मास्टर्स १००० सिरीजचा शेवटचा सामना आहे. जोकोविचने या सिरीजमध्ये पाच सामने जिंकले आहेत, तर मरेने दोन सामन्यांत विजय मिळवला आहे. जोकोविच आणि वावरिंकामधील हा सामना महत्त्वाचा ठरला. जून महिन्यात पॅरीसमध्ये फ्रेंच ओपनच्या अंतिम सामन्यात जोकोविचला वावरिंकाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. सर्बियाच्या या खेळाडूने या वर्षात आॅस्ट्रेलिया ओपन, विम्बल्डन आणि यू.एस.ओपन हे किताब जिंकले आहेत. सामन्याचा पहिला सेट जोकोविचने सहजतेने जिंकला; मात्र दुसऱ्या सेटमध्ये वावरिंकाने त्याची सर्व्हिस भेदली आणि २ -० ची आघाडी घेतली; मात्र उपांत्यपूर्व सामन्यात राफेल नदालला हरवलेल्या वावरिंकाने हा सेट ६ -३
असा जिंकला. तिसऱ्या सेटमध्ये जोकोविचने सर्व्हिस गेमने सुरुवात केली आणि सहजतेने सेट जिंकला आणि सलग तिसऱ्या वर्षी अंतिम फेरीत प्रवेश केला. (वृत्तसंस्था)