ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 2 - भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि मास्टर ब्लास्टर खेळाडू सचिन तेंडुलकरने सोशल मिडीयावर नवी इनिंग सुरू केली आहे. गुरूवारी सचिनने प्रोफेशनल सोशल मिडीया प्लॅटफॉर्म लिंक्डइन (linkedin.com)वर अकाउंट ओपन केलं.
सचिनने स्वतः ट्विटकरून याबाबत माहिती दिली. आजच्या काळात सोशल मिडीयावर अॅक्टिव्ह असणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळेच मी सर्व ठिकाणी अकाउंट ओपन करत आहे असं त्याने ट्विट केलं आहे.
यावेळी लिंक्डइनवर सचिनने 'माय सेकंड इनिंग' नावाने एक ब्लॉग लिहीला आहे. त्यामध्ये पहिल्यांदा क्रिकेट सोडण्याचा विचार कधी आला याबाबत सचिनने खुलासा केला आहे. या ब्लॉगमध्ये सचिनने दोन व्हिडीओही शेअर केले आहेत.
"ऑक्टोबर 2013 मध्ये दिल्लीत चॅम्पियन्स लीग सुरू होती. माझी सकाळ जिममध्ये वर्कआउट करून सुरू व्हायची. 24 वर्षांपासून हा दिनक्रम सुरू होता. मात्र, ती सकाळ जरा वेगळी होती. सकाळी उठण्यास आणि दिवसाची सुरूवात करण्यास मला त्रास होत होता. जिम ट्रेनिंग माझ्या आयुष्यातील किती महत्वाचा भाग होता हे तेव्हा मला कळलं, कारण 24 वर्ष ट्रेनिंग माझ्या आयुष्यातील अविभाज्य भाग होती. त्या सकाळी मला काहीही करायची इच्छा होत नव्हती. का? आता मला थांबायला हवं याचा तो संकेत होता. माझा सर्वात प्रिय खेळ आता माझ्या दिनक्रमातील भाग नसणार याचाही तो संकेत होता". असं सचिनने ब्लॉगमध्ये लिहीलं आहे.
सुनिल गावसकर माझे हिरो
सुनिल गावसकर माझे हिरो आहे. एकदा त्यांनी सांगितलं की, त्यांची नजर वारंवार घड्याळाकडे वळत होती. लंच आणि टी-इंटरवलसाठी किती वेळ बाकी आहे हे ते सारखे पाहात होते. त्याचवेळी त्यांनीही खेळ सोडण्यासाठी मनाची तयारी पक्की केली.