अथश्री देशमुखने उघडले महाराष्ट्राचे खाते
By Admin | Updated: September 7, 2015 00:23 IST2015-09-07T00:23:51+5:302015-09-07T00:23:51+5:30
अथश्री देशमुख हिने ४३व्या सबज्युनियर गट राष्ट्रीय अजिंक्यपद ज्युदो स्पर्धेत महाराष्ट्राच्या पदकांचे खाते उघडताना रौप्यपदकाची कमाई केली.

अथश्री देशमुखने उघडले महाराष्ट्राचे खाते
मुंबई : अथश्री देशमुख हिने ४३व्या सबज्युनियर गट राष्ट्रीय अजिंक्यपद ज्युदो स्पर्धेत महाराष्ट्राच्या पदकांचे खाते उघडताना रौप्यपदकाची कमाई केली.
विजयवाडा (तेलंगणा) येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुलींच्या ४४ वजनी गटात सहभागी होताना अथश्रीने अटीतटीच्या रंगलेल्या सामन्यात रौप्यपदक पटकावले. गतवर्षी राष्ट्रीय स्पर्धेतदेखील रौप्य जिंकणाऱ्या अथश्रीने कामगिरीत सातत्य राखण्यात यश मिळवले.
मिझोरमच्या के. लालमिंगवामावीविरुद्धच्या झालेल्या सलामीच्या लढतीत अथश्रीने बरोबरीनंतर गोल्डन स्कोअर पॉइंटमध्ये तानी ओ तोशी पकडीवर इप्पोन मिळवत आगेकूच केली. यानंतर तिने आक्रमक पवित्रा घेताना छत्तीसगडच्या सिश्मिता दासचा केवळ १५ सेकंदांत फडशा पाडला. उपांत्य फेरीत अथश्रीने पश्चिम बंगालच्या अदवत्ता पॉलीवर एका मिनिटात कोशी गुरुमा फेकीवर इप्पोन मिळवत अंतिम फेरी गाठली. मणीपूरच्या सी. रेभिना देबीविरुद्ध रंगलेला हा सामना बरोबरीत सुटणार असे दिसत असताना रेभिनाने ड्रोप सिओ नागे फेकीत पकडून कामी शियो गटामे पकडीत अथश्रीला नमवले. दरम्यान, यानंतर अन्य एका सामन्यात शीना देशपांडे हिने कांस्यपदकाची कमाई करून महाराष्ट्राची छाप पाडली.