विश्वकप स्पर्धेसाठी मनोधैर्य उंचावण्यास मदत मिळेल : मनोहर
By Admin | Updated: February 1, 2016 02:32 IST2016-02-01T02:32:36+5:302016-02-01T02:32:36+5:30
आॅस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिकेत ३-० ने विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाचे भारतीय नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष शशांक मनोहर यांनी अभिनंदन केले.

विश्वकप स्पर्धेसाठी मनोधैर्य उंचावण्यास मदत मिळेल : मनोहर
नवी दिल्ली : आॅस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिकेत ३-० ने विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाचे भारतीय नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष शशांक मनोहर यांनी अभिनंदन केले. या विजयामुळे आगामी टी-२० विश्वकप स्पर्धेसाठी भारतीय संघाचे मनोधैर्य उंचावण्यास मदत मिळेल, अशी प्रतिक्रिया मनोहर यांनी या वेळी दिली.
भारताने तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत आॅस्ट्रेलियाचा ३-० ने धुव्वा उडवला. या मालिका विजयामुळे भारतीय संघाने आयसीसी टी-२० क्रमवारीत अव्वल स्थानावर झेप घेतली. मनोहर म्हणाले, की टीम इंडियाचा हा शानदार विजय आहे. माझ्यातर्फे कर्णधार महेंद्रसिंह धोनी टीम इंडियाचे हार्दिक अभिनंदन. भारतीय संघाची कामगिरी अभिमानास्पद आहे. या मालिका विजयामुळे भारतीय संघाने क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे.
बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर म्हणाले, की टीम इंडियाने शानदार कामगिरी केली. संघाने केवळ आॅस्ट्रेलियाचा पराभव केला नसून, क्रमवारीत अव्वल स्थानही पटकावले आहे. भारतीय महिला संघानेही आॅस्ट्रेलियाची टी-२० मालिकेत २-१ ने पराभव करीत चाहत्यांना आनंद साजरा करण्याची संधी प्रदान केली. (वृत्तसंस्था)