मॉर्गनच्या खेळीने इंग्लंड विजयी

By Admin | Updated: September 8, 2014 02:32 IST2014-09-08T02:32:20+5:302014-09-08T02:32:20+5:30

कर्णधार इयान मॉर्गनच्या (३१ चेंडू, ७१ धावा) आक्रमक अर्धशतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने एकमेव टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात आज, रविवारी भारताचा ३ धावांनी पराभव केला

England won by Morgan's innings | मॉर्गनच्या खेळीने इंग्लंड विजयी

मॉर्गनच्या खेळीने इंग्लंड विजयी

बर्मिंहॅम : कर्णधार इयान मॉर्गनच्या (३१ चेंडू, ७१ धावा) आक्रमक अर्धशतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने एकमेव टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात आज, रविवारी भारताचा ३ धावांनी पराभव केला. इंग्लंडने मॉर्गन व अ‍ॅलेक्स हेल्स (२५ चेंडू, ४० धावा) यांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाच्या जोरावर ७ बाद १८० धावांची मजल मारली आणि प्रत्युुत्तरात खेळणाऱ्या भारताचा डाव ५ बाद १७७ धावांत रोखला. विराट कोहलीची (६६) अर्धशतकी खेळी अखेर व्यर्थच ठरली. कर्णधार महेंद्रसिंग धोनीने १८ चेंडूंमध्ये नाबाद २७ धावा फटकाविल्या; पण अखेरच्या दोन षटकांत त्याने तीनदा अंबाती रायडूसोबत एकेरी धाव घेण्यास नकार दिला.
डेथ ओव्हरमधील गोलंदाजी उभय संघातील फरक स्पष्ट करणारी ठरली. इंग्लंडने अखेरच्या पाच षटकांमध्ये ८१ धावा वसूल केल्या, तर भारतीय संघाला केवळ ४२ धावा करता आल्या.
यापूर्वी, भारताला कसोटी मालिकेत १-३ ने पराभव स्वीकारावा लागला होता, तर वन-डे सामन्यांच्या मालिकेत भारताने ३-१ ने सरशी साधली.
लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर अजिंक्य रहाणे (८) फिरकीपटू मोईन अलीचे लक्ष्य ठरला. त्यानंतर धवन (२८) व कोहली यांनी ८.५ षटकांत दुसऱ्या विकेटसाठी ७९ धावांची भागीदारी करीत डाव सावरला. धवन माघारी परतल्यानंतर कोहलीने रैनाच्या साथीने तिसऱ्या विकेटसाठी ४.१ षटकांत ४२ धावांची भागीदारी केली. भारताला अखेरच्या चार षटकांत विजयासाठी केवळ ४० धावांची गरज होती. गुर्नेने रैनाचा (२५) त्रिफळा उडवीत भारताचा डाव अडचणीत आणला. अखेरच्या षटकात भारताला विजयासाठी १७ धावांची गरज होती. धोनीने व्होक्सच्या षटकात पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला, तर चौथ्या चेंडूवर चौकार वसूल केला; पण संघाला विजय मिळवून देण्यात त्याचे प्रयत्न अपुरेच पडले. भारताला अखेरच्या चेंडूवर विजयासाठी पाच धावांची गरज होती; पण त्यावर केवळ एक धाव घेता आली.
त्याआधी, इयान मॉर्गनच्या (७१ धावा, ३१ चेंडू, ३ चौकार, ७ षटकार) अर्धशतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने ७ बाद १८० धावांची दमदार मजल मारली.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या इंग्लंडला जेसन रॉय (८) व अ‍ॅलेक्स हेल्स (४०) यांनी चांगली सुरुवात करून दिली. रॉय व त्यानंतर मोईन अली (०) एकापाठोपाठ माघारी परतल्यानंतर, हेल्सने जो रुटच्या (२६) साथीने तिसऱ्या विकेटसाठी ४८ धावांची भागीदारी करीत डाव सावरला. हेल्स व रुट १० धावांच्या अंतरात माघारी परतले. जम बसल्यानंतर इयान मॉर्गनने भारतीय गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत अर्धशतकी खेळी साकारली. मॉर्गनच्या अर्धशतकी खेळीत ३ चौकार व ७ षटकारांचा समावेश आहे. भारतातर्फे मोहम्मद शमी सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ३८ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले. मोहित शर्मा, कर्ण शर्मा व रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. इंग्लंडतर्फे या लढतीत जेसन रॉय व भारतातर्फे कर्ण शर्मा यांनी पदार्पणाची संधी मिळाली. भारताने वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला विश्रांती देताना मोहित शर्माला खेळविण्याचा निर्णय घेतला. (वृत्तसंस्था)

Web Title: England won by Morgan's innings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.