इंग्लंडला स्वत:वर विश्वास ठेवावा लागेल
By Admin | Updated: February 9, 2015 03:58 IST2015-02-09T03:58:19+5:302015-02-09T03:58:19+5:30
विश्वकप स्पर्धेसाठी दाखल झालेला इंग्लंड संघ कामगिरीच्या तुलनेत अधिक सक्षम भासत आहे. या संघात प्रत्येक क्रमांकावर दर्जेदार खेळाडूंचा समावेश आहे

इंग्लंडला स्वत:वर विश्वास ठेवावा लागेल
विश्वकप स्पर्धेसाठी दाखल झालेला इंग्लंड संघ कामगिरीच्या तुलनेत अधिक सक्षम भासत आहे. या संघात प्रत्येक क्रमांकावर दर्जेदार खेळाडूंचा समावेश आहे, पण त्यांना लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश येते, हे धक्कादायक आहे. त्यामुळे या बाबीवर लक्ष द्यावे लागेल.
या विश्वकप स्पर्धेत गोलंदाज वर्चस्व गाजवतील, असे मानले जात असले तरी इंग्लंडकडे मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये नव्या चेंडूचा वापर करणाऱ्या सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक गोलंदाज आहे. जेम्स अॅन्डरसनसारखा गोलंदाज आपल्या संघात असावा, असे प्रत्येक संघाला वाटते. त्याची साथ देण्यासाठी स्टुअर्ट ब्रॉड व स्टीव्हन फिन सज्ज आहेत. आॅस्ट्रेलियाविरुद्धची त्यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. त्याचप्रमाणे ख्रिस व्होक्ससारखा फलंदाजी व गोलंदाजीमध्ये उपयुक्त योगदान देण्यास सक्षम असलेला खेळाडू इंग्लंड संघात आहे.
मोईन अली व जोस बटलर यांच्या समावेशामुळे इंग्लंड संघाचा समतोल साधल्या गेला आहे. मोईन अलीला सलामीवीर म्हणून छाप सोडण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल, पण प्रतिस्पर्धी फलंदाजांना रोखण्याची त्याच्या गोलंदाजीमध्ये क्षमता आहे. त्याचप्रमाणे बटलरला अव्वल सहामध्ये स्थान मिळायला हवे. कारण, सातव्या क्रमांकावर त्याच्या क्षमतेला योग्य न्याय मिळत नाही. तो सामना जिंकून देणारा खेळाडू असून इंग्लंडला ही बाब समजणे आवश्यक आहे.
प्रतिभावान खेळाडूंचा समावेश असला तरी इंग्लंडला जेतेपदाचा दावेदार मानल्या जात नाही. त्याची अनेक कारणे आहेत. त्यांचे खेळाडू लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरतात. या क्रमवारीत सर्वांत वरचा क्रमांक आहे तो इयान बेलचा. जवळजवळ १५० वन-डे सामने खेळण्याचा अनुभव असला तरी बेलला संघातील स्थान निश्चित करता आलेले नाही. स्टीव्हन फिन व इयोन मॉर्गन बाबतही असेच म्हणता येईल. आतापर्यंत या दोन्ही खेळाडूंनी मॅच विनर म्हणून ओळख निर्माण करणे आवश्यक होते. मॉर्गन फिनिशरची भूमिका बजावित आहे. अन्य खेळाडूंच्या साथीने मॉर्गनने संघाला विजय मिळवून देण्याची भूमिका बजाविणे गरजेचे आहे.
तिरंगी मालिकेत आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत त्याने वरच्या क्रमांकावर फलंदाजी केली त्यावेळी त्याची ही क्षमता दिसून आली. फिनच्या उंचीचा विचार करता तो अॅन्डरसनच्या साथीने आघाडीचा गोलंदाज म्हणून महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, पण त्याचा वापर उशिरा करण्यात येतो. इंग्लंडचा संघ विश्वकप स्पर्धेत धोकादायक संघ ठरू शकतो, असा मला विश्वास आहे, पण इंग्लंड संघाला स्वत:वर विश्वास आहे किंवा नाही, याची कल्पना नाही. (टीसीएम)