इंग्लंडने कांगारूंना पाजले पाणी
By Admin | Updated: August 1, 2015 00:32 IST2015-08-01T00:32:41+5:302015-08-01T00:32:41+5:30
पहिल्या डावात जेम्स अँडरसन आणि दुसऱ्या डावात स्टीव्हन फिन यांची धारदार गोलंदाजी आणि त्यानंतर इयान बेलची अर्धशतकी खेळी याबळावर इंग्लंडने तिसऱ्या अॅशेज कसोटी सामन्यात

इंग्लंडने कांगारूंना पाजले पाणी
बर्मिंगहॅम : पहिल्या डावात जेम्स अँडरसन आणि दुसऱ्या डावात स्टीव्हन फिन यांची धारदार गोलंदाजी आणि त्यानंतर इयान बेलची अर्धशतकी खेळी याबळावर इंग्लंडने तिसऱ्या अॅशेज कसोटी सामन्यात आॅस्ट्रेलियाचा ८ गडी राखून पराभव केला. त्याचबरोबर पाच सामन्यांच्या या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे.
आॅस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेले १२१ धावांचे लक्ष्य इंग्लंडने ३२.१ षटकांत फक्त २ गडी गमावून १२४ धावा करीत पूर्ण केले. त्यांच्याकडून इयान बेल याने ९0 चेंडूंत १0 चौकारांसह ६५ आणि जो रुट याने ६ चौकार, एका षटकारासह नाबाद ३८ धावांची खेळी केली.
कुक (७) आणि लिथ (१२) हे सलामीवीर ५१ धावांत परतल्यानंतर इयान बेलने जो रुट याच्या साथीने २१ षटकांत नाबाद ७३ धावांची भागीदारी करीत इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. दुसऱ्या डावात ६ बळी घेणारा स्टीव्हन फिन सामनावीर किताबाचा मानकरी ठरला. या दोन संघातील चौथा कसोटी सामना ६ ते १0 आॅगस्टदरम्यान नॉटिंगहॅम येथे होणार आहे.
त्याआधी पीटर नेव्हिल आणि मिशेल स्टार्क यांच्या झुंजार अर्धशतकी खेळीच्या बळावर आॅस्ट्रेलियाने इंग्लंडला विजयासठी १२१ धावांचे लक्ष्य दिले होते. यष्टीरक्षक नेव्हिल (५९) आणि वेगवान गोलंदाज स्टार्क (५८) यांनी अर्धशतक ठोकतानाच आठव्या गड्यासाठी ६४ धावांची भागीदारी केली; परंतु त्यानंतरही आॅस्ट्रेलियाचा दुसरा डाव २६५ धावांत आटोपला.
तत्पूर्वी दुसऱ्या डावात आॅस्ट्रेलियाच्या अव्वल ६ फलंदाजांत फक्त सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (७७) हाच एकटा दुहेरी आकडी धावसंख्या गाठू शकला. दोन वर्षांनंतर संघात पुनरागमन करणाऱ्या स्टीव्हन फिन याने त्याची सर्वोत्तम कामगिरी करताना ७९ धावांत ६ गडी बाद केले. त्याआधी त्याची सर्वोत्तम कामगिरी १२५ धावांत ६ बळी अशी होती. जी त्याने आॅस्ट्रेलियाविरुद्ध २0१0 मध्ये ब्रिस्बेन येथे केली होती. त्याआधी इंग्लंडला आॅस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात एक जोरदार धक्का बसला. त्यांचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन गुरुवारी झालेल्या दुखापतीमुळे चौथ्या कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही.
संक्षिप्त धावफलक
आॅस्ट्रेलिया : पहिला डाव १३६. दुसरा डाव : २६५.; (डेव्हिड वॉर्नर ७७, पीटर नेव्हिल ५९, मिशेल स्टार्क ५८, स्टिव्हन फिन ६/७९, जेम्स अँडरसन १/१५, स्टुअर्ट ब्रॉड १/६१, मोईन अली १/६४, स्टोक्स १/२८); इंग्लंड : पहिला डाव : २८१. दुसरा डाव : ३२.१ षटकात २ बाद १२४; (इयान बेल नाबाद ६५, जो रुट नाबाद ३८, लिथ १२, अॅलेस्टर कुक ७, हेजलवूड १/२१, हेजलवूड १/२१).