इंग्लंड पराभूत,भारताचा १३३ धावांनी विजय
By Admin | Updated: August 28, 2014 01:43 IST2014-08-28T01:43:52+5:302014-08-28T01:43:52+5:30
सुरेश रैनाच्या आक्रमक, पण आकर्षक शतकामुळे (१००) मिळालेले ‘टॉनिक’ टीम इंडियाने विजयासाठी वापरल्यामुळे बुधवारी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या वन-डेमध्ये इंग्लंडविरुद्ध तब्बल १३३ धावांनी विजय साकार झाला

इंग्लंड पराभूत,भारताचा १३३ धावांनी विजय
कार्डिफ : सुरेश रैनाच्या आक्रमक, पण आकर्षक शतकामुळे (१००) मिळालेले ‘टॉनिक’ टीम इंडियाने विजयासाठी वापरल्यामुळे बुधवारी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या वन-डेमध्ये इंग्लंडविरुद्ध तब्बल १३३ धावांनी विजय साकार झाला.
रवींद्र जडेजाने (४/२८) देखील गोलंदाजीतील कौशल्य पणाला लावून विजयास हातभार लावला. पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ-लुईस नियमांचा अवलंब करण्यात आला होता. या विजयामुळे पाच सामन्यांच्या मालिकेत भारताला आघाडी मिळाली. पावसामुळे पहिला सामना रद्द झाला होता.
रोहित शर्मा (५२), अजिंक्य रहाणे (४१) यांनी भारताला सुरुवातीच्या धक्क्यातून सावरल्यानंतर रैनाने ७५ चेंडूंत १२ चौकार व तीन षटकारांसह १०० धावा केल्या. कर्णधार महेंद्रसिंह धोनी (५२) याच्यासोबत पाचव्या गड्यासाठी १४४ धावांचंी भागीदारी करीत भारताला ५० षटकांत ६ बाद ३०४ अशा सुस्थितीत नेऊन ठेवले. यातील १३३ धावा अखेरच्या १३ षटकांत वसूल झाल्या हे विशेष. इंग्लंडच्या डावाला प्रारंभ होण्यापूर्वीच पावसाने हजेरी लावल्याने ४७ षटकांत २९५ धावांचे यजमान संघाला लक्ष्य देण्यात आले होते. पण भारताच्या वेगवान आणि फिरकी माऱ्यापुढे इंग्लिश फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करल्यामुळे ३८.१ षटकांत १६१ धावांत त्यांचा डाव गडगडला. पहिली वन-डे खेळणारा अॅलेक्स हेल्स याचा ४० धावांचा अपवाद वगळता अन्य फलंदाज अपयशी ठरले. डावखुरा फिरकीपटू जडेजाने ७ षटकांत २८ धावांत चार गडी बाद केले. मोहम्मद शमी याने ३२ धावांत दोन आणि आश्विनने ३८ धावांत दोन गडी बाद केले. भुवनेश्वर आणि रैना यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
तत्पूर्वी नाणेफेक गमाविणाऱ्या भारताची सुरुवात खराब झाली. शिखर धवन (११), आणि विराट कोहली (०) यांचे अपयश संपण्याची चिन्हे आजही दिसली नाहीत. आठ षटकांत २ बाद १९ या बिकट अवस्थेतून अजिंक्य रहाणे (४१) आणि रोहित शर्मा (५२) यांनी तिसऱ्या गड्यासाठी ९१ धावांची भागीदारी करीत बाहेर काढले. दोघेही २२ धावांच्या फरकाने बाद झाल्यानंतर त्यांची जागा रैना-धोनी यांनी घेतली. पॉवर प्लेमध्ये दोघांनी सुरेख फटकेबाजी केली. रैनाचे गेल्या साडेचार वर्षांत हे पहिले, तर वन-डेतील चौथे शतक ठरले. कर्णधार महेंद्रसिंह धोनी यानेही जबाबदारी ओळखून अर्धशतक (५२) ठोकले. ३० षटकांत ४ बाद १३२ या स्थितीत रैना-धोनी यांनी खेळाची सूत्रे स्वीकारून पाचव्या गड्यासाठी १४४ धावांची भागीदारी केली.
ख्रिस वोक्स इंग्लंडचा यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ५२ धावा देत चार, तर फिरकीपटू जेम्स ट्रेडवेल याने ४२ धावांत दोन गडी बाद केले. (वृत्तसंस्था)