इंग्लंडचा क्रिकेटपटू जोनाथन ट्रॉटची निवृत्ती
By Admin | Updated: May 6, 2015 02:32 IST2015-05-05T20:20:52+5:302015-05-06T02:32:43+5:30
जोनाथन ट्रॉटची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

इंग्लंडचा क्रिकेटपटू जोनाथन ट्रॉटची निवृत्ती
जोनाथन ट्रॉटची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
लंडन : इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जोनाथन ट्रॉटने वेस्ट इंडीज दौर्यातील संघाच्या निराशाजनक कामगिरीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. ३४ वर्षीय ट्रॉटने गेल्या महिन्यात मानसिक आजारातून सावरल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले; पण विंडीज दौर्यात मात्र तो सपशेल अपयशी ठरला. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत तो तीन वेळा शून्यावर बाद झाला. या मालिकेत त्याला केवळ ७२ धावा करता आल्या.
इंग्लंड व वेल्स क्रिकेट बोर्डातर्फे प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत ट्रॉट म्हणाला, 'हा निर्णय कठीण होता; पण इंग्लंड संघाला आवश्यक असलेली कामगिरी माझ्याकडून होत नसल्याचे लक्षात आले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची संधी मिळाल्याचा मला अभिमान आहे; पण संघासाठी योगदान देता न आल्याचे दु:ख वाटते,'
ट्रॉट पुढे म्हणाला, 'इंग्लंड संघाने आगामी सर्व मालिकांमध्ये विजय मिळवावा आणि सर्वोत्तम संघ म्हणून मान मिळवावा, अशा शुभेच्छा देतो. इंग्लंड संघाचे प्रतिनिधित्व करताना कारकिर्दीत अनेक चढ-उतार अनुभवले. कधी चांगली कामगिरी झाल्यामुळे आनंद झाला, तर निराशाजनक कामगिरीमुळे दु:खही झाले. भविष्यात वार्विकशायर संघाचे प्रतिनिधित्व करणार असून, संघासाठी उल्लेखनीय योगदान देण्यात यशस्वी ठरेन, अशी आशा आहे.'ट्रॉटने आजारपणामुळे २०१३-१४च्या अॅशेस मालिकेतून माघार घेतली होती.