भारताचे आव्हान संपुष्टात

By Admin | Updated: October 3, 2015 00:26 IST2015-10-03T00:26:13+5:302015-10-03T00:26:13+5:30

आशियाई चॅम्पियनशिपमध्ये १२ वर्षांनंतर उपांत्यपूर्व फेरी गाठणाऱ्या भारतीय संघाला यजमान चीनचे कडवे आव्हान पेलता आले नाही.

Ending the Challenge of India | भारताचे आव्हान संपुष्टात

भारताचे आव्हान संपुष्टात

चांगशा (चीन) : आशियाई चॅम्पियनशिपमध्ये १२ वर्षांनंतर उपांत्यपूर्व फेरी गाठणाऱ्या भारतीय संघाला यजमान चीनचे कडवे आव्हान पेलता आले नाही. चीनने ही लढत १0४-५८ अशा मोठ्या फरकाने जिंकली.
चीनने गुरुवारी झालेल्या या एकतर्फी लढतीत भारताला पराभूत करीत पुढील फेरीतील जागा पक्की केली. आता चीनची लढत इराण संघाविरुद्ध होईल, तर भारतीय संघ पाचव्या ते आठव्या स्थानासाठी कोरियाविरुद्ध दोन हात करील.
१२ वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर आशियाई चॅम्पियनशिपची उपांत्यपूर्व फेरी गाठणाऱ्या टीम इंडियाला
चारही सत्रात आपला खेळ उंचावता आला नाही. चीनने प्रारंभापासूनच वर्चस्व राखताना २७-१५, २९-१४, १९-११ आणि २९-१८ असा विजय मिळवला.
सामन्याच्या सुरुवातीच्या काही मिनिटांपर्यंत भारतीय संघ पुढे होता; परंतु त्यानंतर चीनने भारतीय खेळाडूंना डोके वर काढण्याची संधी मिळू दिली नाही. चीनचे नेतृत्व करणाऱ्या माजी एनबीए खेळाडू यी जियानलियान याने सर्वाधिक २१ गुण नोंदवले, तर भारताकडून कर्णधार विशेष भृगुवंशीने सर्वाधिक २२ गुण नोंदवले.
या स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक स्कोअरर ठरणारे अमज्योतसिंह आणि फॉरवर्ड यारविंदरसिंह यांनीदेखील महत्त्वपूर्ण योगदान दिले; परंतु ते संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. गतवर्षी फिबा एशियाकपमध्ये भारताने चीनला ६५-५८ असे नमवले होते; परंतु या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यात भारतीय संघ अपयशी ठरला. भारताने त्यांच्या पहिल्या क्लासिफिकेशन सामन्यात कोरियावर विजय मिळवला, तर ते दुसऱ्या क्लासिफिकेशन सामन्यात कतार आणि लेबनॉन यांच्यातील विजयी संघाविरुद्ध पाचव्या व सहाव्या स्थानासाठी खेळतील. जर भारताने दुसरीही लढत जिंकली तर ते
स्पर्धेतील सहावे स्थान प्राप्त करतील व त्यांची ही १९८९ नंतरची सर्वोत्तम कामगिरी ठरेल. (वृत्तसंस्था)

Web Title: Ending the Challenge of India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.